रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज नागपुरात दाखल! उद्या, विधानभवनावर करणार हल्लाबोल; शेतकऱ्यांचा इंगा काय असतो हे सरकारला दाखवून देणार! रविकांत तुपकरांचा इशारा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा उभारला आहे. गेल्या २ महिन्यांत एल्गार रथयात्रा, बुलडाण्यातील एल्गार महामोर्चा, सोमठाण्यातील अन्नत्याग आंदोलन, त्यानंतरचे मंत्रालय ताब्यात घेण्याचे आंदोलन झाल्यानंतर रविकांत तुपकरांची २९ नोव्हेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य सरकारसोबत चर्चा झाली. त्यानंतर सोयाबीन कापसाच्या दरवाढीसंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत तुपकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. तुपकर यांच्या बहुतांश मागण्या राज्य आणि केंद्र सरकारने मान्य केल्या होत्या. तुपकर यांनी अंमलबजावणी करण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंतचा अल्तीमेटम सरकारला दिला होता. मात्र निर्धारीत वेळेत अंमलबजावणी न झाल्याने रविकांत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेत विधानभवनावर हल्लाबोल करण्याचा इशारा दिला होता. ठरल्याप्रमाणे आज,१८ डिसेंबरला दुपारी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नागपूरकडे कूच केले. समृध्दी महामार्गाने हजारो शेतकरी नागपुरात दाखल असून उद्या,१९ डिसेंबरला तुपकरांच्या नेतृत्वात शेतकरी विधानभवनावर हल्लाबोल करणार आहेत.
Cars
येलो मोझॅक,बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १००% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी,पिकविम्याची १००% फायनल रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या २ महिन्यांपासून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, एल्गार रथयात्रा, २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात झालेला एल्गार महामोर्चा, सोमठाणा येथे रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने २९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य करण्यात आल्या होत्या.तसेच सोयाबीन-कापूस दरवाढीसंदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत ९ डिसेंबर रोजी बैठक झाली. काही गोष्टींसाठी सरकार सकारात्मक असल्याचे बैठकीत केंद्रीय मंत्री गोयलांनी सांगितले. मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत संपली पण सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरवात केली नसल्याने, शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार आज, १८ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळील फर्दापूर टोल येथून शेतकऱ्यांची फौज नागपूरच्या दिशेने रवाना झाली. आज सायंकाळी साडेसातला शेतकऱ्यांची ही फौज 
नागपुरात पोहचली. ठरल्याप्रमाणे उद्या, सकाळी रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अधिवेशनावर "हल्लाबोल" आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचा इंगा काय असतो हे उद्या सरकारला दाखवून देऊ असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
तुपकरांचा गनिमी कावा?
नेमकं काय करणार...
"आमच्या मागण्या १५ डिसेंबरच्या आत मान्य कराव्यात, सरकारने दिलेला शब्द पाळावा. अन्यथा पुढील आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने करू"असे भाष्य तुपकर यांनी २९ नोव्हेंबरला सह्याद्रीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. तुपकर यांनी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली असली तर या आंदोलानाचे नेमके स्वरूप काय असेल याबद्दल बोलणे टाळले आहे. तुपकर यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनांची आगळीवेगळी स्टाईल पाहता उद्या नागपुरात तुपकर नेमकं काय करणार याकडे पोलीस यंत्रणांसह साऱ्यांचे लक्ष लागून आहे..