अमरावती पदवीधर निवडणूक, बुलडाण्यात ५३.०४ टक्के मतदान! पाचही जिल्ह्यातील ४९.६७ टक्केवारी!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी काल ३० जानेवारीला जिल्ह्यातील ५२ केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५३.०४ टक्के मतदान झाले.अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील ४९.६७ इतकी टक्केवारी आहे. ही मतदानाची टक्केवारी चिंतनिय म्हणावी लागेल. असे असले तरी, बुलडाण्यात भाजपा की महाविकास आघाडीचा उमेदवार बाजी मारतोय? याची सुरस चर्चा सुरू झाली आहे.

भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या चुरशीची लढत रंगली. आज मतदान देखील पार पडले.

जिल्ह्यात एकूण ३७ हजार८९४  मतदार आहेत. यात १० हजार ७२६ महिला आणि २७ हजार १६८ पुरूष मतदार आहेत. जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ६.३८ टक्के मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत १७.८९  टक्के मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत ३३.४७ टक्के मतदान झाले. त्यानंतर ४ वाजेपर्यंत ५३.०४ टक्के एकूण मतदान झाले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सकाळी बुलडाणा तहसिल कार्यालय, एडेड हायस्कूल, शिवाजी हायस्कूल या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मतदारांना मतदानासाठी एका रांगेत ठेवणे, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी पुरविणे, मतदान केंद्रावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सोयी आदीबाबत सूचना केल्यात. मात्र मतदानासाठी पदवीधरांमध्येही पाहिजे तेवढी उत्सुकता दिसून आली नाही.

कोणत्या जिल्ह्यात किती मतदान? 

बुलडाणा - ५३.०४ टक्के, अमरावती - ४३.३७ टक्के, अकोला-४६.९१ टक्के,वाशिम- ५४.८० टक्के, यवतमाळ- ५८.८७ टक्के असे पाचही जिल्ह्यात मिळून अमरावती विभागीय पदवीधर निवडणुकीची ४९.६७ टक्केवारी आहे.