सारी "मोहमाया'... लोक नाकारतात, त्‍यांचेच प्रतिनिधी मात्र आनंदाने "स्वीकारतात'!

रंगत विधान परिषद निवडणुकीची...
 
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधान परिषदेच्या अकोला -बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपाचे वसंत खंडेलवाल आणि महाविकास आघाडीचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यात थेट लढत होत आहे. सलग १८ वर्षे आमदार राहिलेल्या बाजोरियांच्या समोर यावेळी त्‍यांच्यासारखाच तगडा उमेदवार असल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. आपण सलग निवडून येतो याचा अर्थ मतदारांमध्ये लोकप्रिय असू असा भ्रम बाजोरियांचा २०१४ मध्ये झाला होता. पण विधानसभा निवडणुकीत मतदारांनी इतक्या स्पष्टपणे नाकारले की ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. नागरिक मतदारांनी नाकारलेल्या बाजोरिया हे लोकप्रतिनिधींचे एवढे लाडके का होतात, ही काय "मोहमाया' आहे, याचा उलगडा नागरिकांना होत नाही असे नाही. पण तरीही या निवडणुकीचा "अर्थ'च या सर्व प्रकारामुळे बदलत असल्याची नाराजी सातत्याने लोकप्रतिनिधींना निवडून देणाऱ्या सामान्य नागरिकांत व्यक्‍त होत असते.

१० डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. १४ डिसेंबरला मतमोजणी होऊन अकोला -बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा विधान परिषदेचा नवा आमदार कोण असेल, याचे उत्तर मिळेल. बाजोरिया आजवर निवडून आले तेव्हा शिवसेनेच्या सोबत भाजप होती. यावेळी चित्र वेगळे आहे. भाजपानेही वसंत खंडेलवाल यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे. २०१४ मध्ये जेव्हा शिवसेनेने बाजोरियांना विधानसभा निवडणुकीत उभे केले होते, तेव्हा निष्ठावंतांना डावलल्याची मोठी भावना निर्माण झाली होती. ती चूक शिवसेनेला महागात पडली होती. बाजोरिया उद्योगपती आहेत. राजकारणाचा पिंड नसताना १८ वर्षांपूर्वी राजेंद्र पाटणी यांच्याऐवजी शिवसेनेने बाजोरियांना विधान परिषदेवर संधी दिली.  १८ वर्षे आमदार असले तरी बाजोरीया यांचा पक्षसंघटनेत मात्र दबदबा नाही. निवडणुका लागल्या की जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांच्या भेटी घ्यायच्या. या जनतेचे प्रतिनिधी म्‍हणवल्या जाणाऱ्या मतदारांना खुश करायचे आणि पुन्हा आमदार व्हायचे हीच त्यांची आतापर्यंतची पद्धत राहिल्याचा आरोप होत असतो. मात्र असे असले तरी ते "मातोश्री'च्या कायम जवळचे राहिले.

याच कारणास्तव त्‍यांना विधान परिषद सदस्य असतानाही आणि डझनभर उमेदवार स्पर्धेत असताना २०१४ ला विधानसभेच्या अकोला पूर्व मतदारसंघात शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत बाजोरिया तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. भारिपचा उमेदवार मते मिळवण्यात त्‍यांच्यापुढे होता. बाजोरियांना ३५ हजार ५१४ तर विजयी ठरलेले भाजपचे रणधीर सावरकर यांना ५३ हजार ६७८ मते मिळवली होती. विधान परिषद निवडणुकीच्या तुलनेत कमी खर्चिक असलेल्या विधानसभा निवडणुकीत बाजोरियांना लोकांनी नाकारले होते. यातून बाजाेरिया केवळ विधान परिषदेच्या निवडणुकीतच लोकप्रतिनिधींवर "मोहमाया' करण्यात यशस्वी होतात हे स्पष्ट झाले. सामान्य मतदारांवर या मोहमायाचा काहीही फरक पडला नाही, हेही दिसून आले. बाजोरिया उद्योगपती असले तरी सत्तेप्रतीही प्रचंड महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसते. मुलगा विप्लव बाजोरिया यांनासुद्धा त्‍यांनी विधान परिषदेवर निवडून आणले. परभणी- हिंगोली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून त्‍यांनी मुलाला निवडून आणत सोबत सभागृहात घेऊन गेले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही बाजोरिया यांनी अकोट मतदारसंघातून उमेदवारीसाठी हट्ट धरला होता, हे विशेष. मात्र युती झाल्याने हा मतदारसंघ भाजपला सुटला आणि भाजपचे प्रकाश भारसाकळे अकोट मतदारसंघातून आमदार झाले. बाजोरिया यांना सामान्य नागरिक नाकारतात, मात्र याच सामान्य नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती त्‍यांना कसे स्वीकारतात, असा प्रश्न लोकांच्या मनात कायमच राहतो...