अग्निवीर योजना भारतीय सैन्यात उभी फूट पाडणारी अन् देशाच्या सुरक्षेसाठी घातक! काँग्रेसच्या माजी सैनिक आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आरोप!

पिंपळगाव सराईत घेतली शहीद अग्निवीर जवान अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांची भेट; म्हणाले, राज्य सरकारने केवळ १० लाख देणे लज्जास्पद! भीक नको सन्मान द्या...
 
Vcdc
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेली अग्निवीर योजना देशसेवेसाठी लष्करात भरती होण्यास इच्छुक असलेल्या युवकांसाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे.काँग्रेसने या योजनेचा सुरुवातीपासून विरोध केला. आता अग्निवीर जवान शहीद व्हायला लागल्यावर या योजनेतील फोलपणा व खा.राहुल गांधींच्या भूमिकेमागचे वास्तव समोर आले आहे. ही योजना देशाच्या सैन्यात उभी फूट पाडणारी आहे त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आल्याचा घणाघाती आरोप काँग्रसच्या माजी सैनिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल रोहित चौधरी यांनी केला. खा. राहुल गांधींच्या वतीने पिंपळगाव सराई येथील शहीद अग्निवीर जवान यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ते आज पिंपळगाव सराई येथे आले होते. त्यानंतर बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जाती धर्मावरून सैन्यात फूट पाडण्याचे प्रयत्न फसल्यानंतर केंद्राने त्यासाठी अग्निवीर योजनेची अंमलबजावणी केल्याचे कर्नल रोहित चौधरी म्हणाले. या योजनेतून भारतीय सेनेत नियमित सैनिक व अल्पकाळ सेवा करणारे अग्निवीर अशी फूट पडल्याचे ते म्हणाले. खा. राहुल गांधी यांनी वेळीच या योजनेतील धोका ओळखला होता. त्यामुळे त्यांनी या योजनेला प्रखर विरोध केला ,आंदोलन केले. आता अग्निवीर शहीद व्हायला लागल्यावर योजनेतील त्रुटी दिसायला लागल्याचे ते म्हणाले. या योजनेमुळे अग्निवीरांचे जीव आणि देशाची सुरक्षा दोन्ही धोक्यात आल्याचे ते म्हणाले. नियमित सैनिक व अग्निवीर यांना मिळणारे वेतन, आर्थिक लाभ, सेवा काळ यात मोठा फरक असल्याचे ते म्हणाले.अग्निवीरांना पेन्शन, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा नाहीत. साडेएकविसाव्या वर्षी निवृत्त होणार असल्याचे भविष्य अंधकारमय आहे तसेच माजी सैनिकांचा दर्जा नसल्याने माजी सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा नाहीत असे निवृत्त कर्नल रोहित चौधरी म्हणाले.
   देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना दीर्घ प्रशिक्षणाची आवश्यकता असते मात्र केवळ ६ महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांची थेट सियाचिन ग्लेशीअर सारख्या धोकादायक ठिकाणी नियुक्ती करण्यात येते. शहीद अक्षय गवते त्याचे उदाहरण ठरल्याचे ते म्हणाले.या योजनेतील फोलपणामुळे पुढील ५ वर्षात भारतीय सैन्यातील संख्या १५ लाखांवरून १० लाखांपर्यंत कमी होईल, यात अडीच लाख अग्निवीर असतील असेही रोहित चौधरी म्हणाले. भारताच्या विस्तीर्ण सीमा रेषा लक्षात घेता अग्निवीरांच्या भरवश्यावर सुरक्षा अबाधित ठेवू शकत नसल्याचेही रोहित चौधरी म्हणाले. ही योजना बंद करावी अशी आमची मागणी आहे. एक सैनिक म्हणून मला राज्यकर्त्यांची लाज वाटते. या योजनेचे समर्थन करणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपल्या मुलांना अग्निवीर करण्याचे थेट आव्हान चौधरी यांनी यावेळी केले.
भीक नको,सन्मान द्या..!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शहीद जवान अक्षयच्या कुटुंबीयांना केलेली १० लाखांची मदत तुटपुंजी आहे. शहिदांना भिक नको सन्मानाची गरज असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारला ही योजना कायम ठेवायचीच असेल तर नियमित सैनिक व अग्निवीर यांच्यातील भेदाभेद दूर करून त्यांना समान पातळीवर आणा. राज्य सरकारकडून शहीदाला १ कोटींची मदत, शहीद जवानाच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि १० एकर शेती देण्याची मागणी यावेळी चौधरी यांनी केली. पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धिरज लिंगाडे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, विजय अंभोरे यांची उपस्थिती होती...