कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खा. जाधवांची प्रतिक्रिया! म्हणाले, लढत अटीतटीची झाली, एका एका मताने आमच्या...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल,२८ एप्रिलला मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालली. अंतिम फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला, त्यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपुत्र पॅनलला ११ तर महाविकास आघाडीच्या पॅनलला ७ जागा मिळाल्याचे जाहीर झाले. आपलाच विजय झाल्याच्या अविर्भावात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच जल्लोष साजरा केला मात्र त्यांना अतिउत्साहीपणा नडल्याचे समोर आले. दरम्यान सलग सातव्यांदा मेहकरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकवल्यानंतर खासदार प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा ऐतिहासिक विजय असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
 

   मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भूमिपुत्र शेतकरी विकास पॅनल विरुद्ध सर्वपक्षीय पॅनल अशी अटीतटीची लढत झाली. गेल्या ५ वर्षांपासून मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यात आहे आणि पुढील ५ वर्षांसाठी जनतेने आमच्या बाजूने कौल दिला असून आमचे ११ उमेदवार निवडून आल्याचे खासदार प्रतापराव जाधव म्हणाले. विरोधी सर्वपक्षीय गटाचे ७ उमेदवार निवडून आले, निवडणूक अटीतटीची झाली, एक एक दोन दोन मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाल्याचे खासदार जाधव म्हणाले. सातव्यांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी विश्वास दाखवल्याबद्दल खासदार जाधवांनी शेतकऱ्यांचे,मतदारांचे आभार मानले.