मंत्रिपदाचा मेळ हुकल्यानंतर "त्यागी" आमदार संजय कुटेंनी दोनच शब्दात पुढची रणनीती सांगितली! म्हणाले, सयंम....

 
sanjay kute

बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  ४० आमदार सोबत असलेल्या एकनाथ शिंदेच्या समर्थक आमदारांना ९ मंत्रिपद, नेमके किती आमदार सोबत हे अजूनही निश्चीत नसलेल्या अजित पवारांच्या आमदारांना ९ मंत्रिपद आणि १०५ आमदार  असूनही भाजपला तेवढीच मंत्रिपद..! सत्तेतील प्रमुख आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष असुनदेखील राजकीय वाटाघाटीत केवळ ९ मंत्रीपदावर समाधान मानावे लागणाऱ्या भाजपच्या आमदारांची मनातून  नाराजी असणे स्वाभाविक आहे. मात्र जशी नाराजी शिंदेच्या नेतृत्वातील भरत  गोगावले, शिरसाट या आमदारांनी उघडपणे बोलून दाखवली तशी भाजपच्या कोणत्याही  आमदाराने व्यक्त केली नाही. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठ आमदारांना सामावून घेतले जाईल असे वाटत असतांना अचानक सत्तेत राष्ट्रवादीची एन्ट्री झाली, राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाली. मात्र त्यानंतर आज, उद्या म्हणता म्हणता पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. बुलडाणा जिल्ह्यातून संजय रायमुलकर आणि संजय कुटे ही दोन नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती,मात्र आता ती पुन्हा हवेत विरली आहेत. आमदार रायमुलकरांनी अनेकदा मंत्रीपदाची इच्छा उघडपणे व्यक्त केली असली तरी संजय कुटे यांनी मात्र जाहीरपणे इच्छा प्रदर्शित केल्याचे दिसले नाही. अशातच आता आमदार संजय कुटेंनी केलेली एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

add

                           ( जाहिरात )

"संयम...विश्वास" या दोनच शब्दात  आमदार संजय कुटेंनी त्यांच्या भावना फेसबुक द्वारे व्यक्त केल्या आहेत. २००४ पासून तर आजतागायत तब्बल ४ वेळा संजय कुटे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शेवटच्या काही महिन्यांत त्यांची कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी लागली होती, बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

   राज्याच्या सत्तांतरणात देवेंद्र फडणवीसांनी विश्वासू संजय कुटेंवर महत्वाची जबाबदारी सोपवली. शिंदेच्या नेतृत्वातील आमदार सुरत आणि गुवाहाटीत होते तेव्हा संजय कुटे देखील त्यांच्यासोबत होते. शिंदेच्या आमदारांची "काळजी" घेण्याची मोठी जबाबदारी आमदार कुटेंनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे या कामगिरीचे बक्षीस मंत्रिपदाच्या रुपात त्यांना नक्कीच मिळेल असे जिल्हावासियांना वाटले होते. मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातून वगळलेल्या डॉ.कुटेंना अजून संधी मिळाली नाही. दुसऱ्या विस्तारात केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांना संधी मिळाली. तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात हमखास जमेल असे वाटत असतांना तो विस्तार मात्र काही झालाच नाही.

 त्याग...?

काही महिन्याआधी देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्यागाचे महत्व पटवून दिले होते. पक्षासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागेल असे सूचक विधान त्यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एंट्रीने सत्तेत वाटेकरी वाढल्याने आ. कुटे यांचा वाटा लांबला की आमदार कुटेंना फडणवीसांनी त्याग करायला लावला? याचे उत्तर आमदार कुटेंनाच माहीत. मात्र फेसबुक पोस्ट मध्ये "आपण संयमी असून आपला नेत्यांवर विश्वास आहे.."असेच आमदार कुटेंना सांगायचे असेल.