पूर्वनियोजित प्रचार दौरा सोडून खा.प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले; आज मोताळा तालुक्यात अवकाळीचा तडाखा

 
मोताळा
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,१२ एप्रिलच्या दुपारी मोताळा तालुक्यात प्रचंड अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे निवासी भागासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच पूर्वनियोजित प्रचार दौरा सोडून खा. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व मदतीसाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. यावेळी आ.संजय गायकवाड, भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत त्यांच्यासोबत होते.
  आज १२ एप्रिलला मोताळा तालुक्यातील मोताळा शहर, बोराखेडी, वडगांव, अंत्री शिवारात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ज्वारी, कांदा, उन्हाळी मका , भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. खा.प्रतापराव जाधव लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार जळगाव जामोद तालुक्यात होते. मात्र मोताळा तालुक्यातील नुकसानी ची माहिती मिळताच खा.जाधव यांनी आपले ठरलेले कार्यक्रम रद्द करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याला प्राधान्य दिले. याआधी लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती तेव्हाही पडत्या पावसात खा.जाधव सर्वात आधी अधिकाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले होते.त्यांच्या पाठपुराव्यामुळेच नोव्हेंबरच्या अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.दरम्यान आज देखील खा.जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. निवडणूक येतील आणि जातील पण शेतकरी महत्वाचा आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. त्यामुळे काळजी करू नका, नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा शब्द यावेळी खा.जाधव यांनी दिला