मुंबईच्या हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यावर रविकांत तुपकरांनी थेट सोमठाणा गाठले! गावकऱ्यांकडून जंगी स्वागत;

तुपकर म्हणाले सरकारने शब्द पाळला नाही तर १५ डिसेंबरनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आंदोलन; काय करणार ते आत्ताच सांगणार नाही,पण सरकारच्या बुडाखाली आग लावणार म्हणाले...
 
सोमठाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अन्नत्याग आंदोलनमुळे प्रकुती खालावल्याने सरकारशी झालेल्या चर्चेनंतर रविकांत तुपकर यांच्यावर मुंबईत सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज होताच तुपकरांनी ज्या गावातून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते ते सोमठाणा गाव गाठले. यावेळी गावकऱ्यांनी तुपकर यांचे फटाके फोडून, पुष्पवर्षाव करून जंगी स्वागत केले. "सोमठाणा गावाने आंदोलनाला ताकद दिली, अन्नत्याग आंदोलनदरम्यान आंदोलन स्थळी भेटायला आलेला एकही पाहुणा गावकऱ्यांनी उपाशी जाऊ दिला नाही,लोकवर्गणी करून अन्नछत्र चालवले..या गावाचे उपकार मी कधीही विसरणार नाही..तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला मी आलोय" असे म्हणत तुपकर यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. यावेळी झालेल्या सभेत तुपकर यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. त्याआधी मुंबईत काय काय झालं, सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीचा सविस्तर वृत्तान्त तुपकर यांनी गावकऱ्यांना सांगितला.
Dhanik
                        जाहिरात 👆
सोयाबीन कापसाच्या भाववाढीचा विषय केंद्र सरकारशी निगडित आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत बैठक लावण्याचा शब्द दिला असल्याचे तुपकर यांनी सांगितले. याशिवाय येलो मोझॅक, बोंडअळी ची नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. पीक विम्याची अग्रिम रक्कम हिवाळी अधिवेशनाच्या मध्यापर्यंत तर अंतिम रक्कम महिनाभरात देण्याचा शब्द सरकारने दिला असल्याचे तुपकरांनी सोमठाणा वासियांना सांगितले. दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचा विचार होणार, वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतीला तारेचे सिमेंटचे मजबूत कंपाऊंड करण्याची योजना सरकार आणणार आहे, दूध उत्पादकांसाठी स्पेशल पॅकेजचा अधिवेशनात निर्णय, शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यातून शेतमजुरांच्या आरोग्याचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचा शब्द सरकारने दिला असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. मात्र सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर गाठ आमच्याशी आहे हे ध्यानात ठेवावे असा इशारा यावेळी तुपकर यांनी दिला..
जिल्ह्यातले काही नेते पिसाळल्यावानी करत आहेत..
बुलडाण्यात झालेला एल्गार महामोर्चा यशस्वी झाला. प्रचंड गर्दी झाली. एल्गार महामोर्चा झाल्यापासून जिल्ह्यातले काही नेते पिसाळल्यावानी करत आहेत असा टोला यावेळी तुपकर यांनी लगावला. 
१५ डिसेंबर नंतर काय...?
आम्ही सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. १५ दिवसांच्या आत सरकारने आमच्या मागण्यासंदर्भात योग्य ते निर्णय घ्यावेत. अन्यथा १५ डिसेंबर नंतर महाराष्ट्र पेटतांना पहावा, हजारो शेतकरी नागपूर अधिवेशनावर धडक देतील..त्याबद्दल सध्या विस्तृत सांगत नाही..मात्र यापुढे होणारे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने असेल..या आंदोलनाने सरकारच्या बुडाखाली आग लागल्याशिवाय राहणार नाही असे तुपकर म्हणाले..