मतदानासाठी प्रशासन तर "भेटीसाठी' मतदार सज्ज!

367 सदस्यांसाठी 11 बूथ, 66 कर्मचारी नियुक्त; अकोल्याहून आज संध्याकाळी पोहोचणार साहित्य, उद्या मतदान
 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीने पार पडलेल्या अतितटीच्या लढतीची सेमिफायनल अर्थात मतदान उद्या, 10 डिसेंबरला होणार असून, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यासाठी निर्धारित 11 मतदान केंद्रांवर 66 अधिकारी, कर्मचारी मतदान प्रक्रियेची जबाबदारी पार पाडणार असून, आज, ९ डिसेंबरला संध्याकाळपर्यंत अकोल्यावरून मतदान साहित्य घेऊन येणारी टीम या केंद्रांवर पोहोचणार आहे.

gauri

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत- अहिरे, 6 एसडीओ व 13 तहसीलदारांनी मतदानाची जय्यत तयारी केली आहे. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सुनील आहेर, जीवन ढोले, राम जाधव, अमोल वानखेडे, श्री. बोक्से यांनी यासाठी सहकार्य केले. मोताळा, संग्रामपूर वगळता उर्वरित 11 तहसील स्थळी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष पदाची धुरा तहसीलदार सांभाळणार आहे. त्यांच्याशिवाय 3 मतदान अधिकारी, पडदानशीन सदस्यांसाठी एक महिला कर्मचारी मिळून 66 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय कोविडविषयक निर्देशांचे पालन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक तैनात राहणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांनी यासाठी आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत.

नांदुरा, मेहकरात पं.स., 9 ठिकाणी तहसीलमध्ये मतदान
दरम्यान, नांदुरा व मेहकर तालुक्यातील मतदान केंद्र पंचायत समितीमध्ये राहणार आहे. उर्वरित 9 ठिकाणी तहसील कार्यालयातच मतदान होणार आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात पार पडणाऱ्या बुलडाणा तहसील केंद्रात सर्वाधिक म्हणजे 102 मतदार आहेत. यात जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती मिळून 71 आणि बुलडाणा पालिकेच्या 31 नगरसेवकांचा समावेश आहे. उर्वरित केंद्रनिहाय मतदार संख्या अशी ः चिखली 30, देऊळगाव राजा 21, सिंदखेड राजा 19, लोणार 20, मेहकर 27, खामगाव 37, शेगाव 32, जळगाव 21, नांदुरा 26 आणि मलकापूर 32.

मतपेट्या, मतपत्रिकाचा वापर!
या लढतीचे मतदान मतपेट्या आणि मतपत्रिकेचा वापर करून व पसंतीक्रम पद्धतीने घेण्यात येते. यामुळे सदस्यांना काळजीपूर्वक मतदान करावे लागणार असून, यात गफलत झाल्यास मत वाया जाणार आहे. सदस्यांना बॅलेट पेपरमधील पहिल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोरील पसंती क्रम नोंदवावा या रकान्यात 1 हा आकडा नोंदवावा लागेल. तो एक असा अक्षरी  लिहू नयेत. पहिल्या पसंतीचे मत नोंदविणे बंधनकारक असून तसे न केल्यास मतदान अवैध ठरणार आहे. पहिल्या पसंतीचे मत एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहिता येईल. अन्य पसंतीक्रम जसे 2 लिहिणे, मतदारांच्या मनावर अर्थात ऐच्छिक असून तो देखील आकड्यातच लिहावा लागणार आहे. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी पहिल्या पसंतीचे मत नोंदविणे आवश्यक आहे. मात्र एकच पसंतीक्रम दोन किंवा अधिक उमेदवारांसमोर लिहिता येणार नाहीये! तसे केल्यास मतपत्रिका अवैध ठरेल. याशिवाय मतपत्रिकेवर कोठेही सही, अध्याक्षरे, नाव अथवा कोणताही शब्द लिहिल्यास, अंगठ्याचा ठसा उमटविल्यास मतदान वाया जाणार आहे.