प्रतापरावांना मत म्हणजे मोदींना मत, प्रतापरावांना मत म्हणजे देशाला मत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन;

म्हणाले, प्रतापराव यंदा चौकार मारणारच! बुलडाण्यात महायुतीचा जंगी पदाधिकारी मेळावा! गुलाबराव पाटील म्हणाले, प्रतापराव जाधव २ लाखांच्या लीड ने विजयी होतील...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ही निवडणूक साधीसुधी निवडणूक नाही, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. राष्ट्रहितासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान करायचे आहे. अबकी बार ४०० पार मध्ये प्रतापराव जाधव नंबर एकवर पाहिजेत. आता हॅट्रिक झाली आहे, मतदारसंघात महायुतीची एवढी ताकद असल्याने प्रतापराव जाधव चौकार मारणारच आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बुलढाणा शहरातील धाड नाका येथे आज १४ एप्रिल रोजी आयोजित महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर ना. गुलाबराव पाटील, खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.राजेंद्र शिंगणे,आ. संजय कुटे, आ.संजय रायमुलकर, आ.आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले, आ.संजय गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, बळीराम मापारी, माजी आ.तोताराम कायंदे, माजी आ. धृपदराव सावळे, माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर,भाजपचे योगेंद्र गोडे, मनसेचे विठ्ठल लोखंडकार, आरपीआयचे विजय गवई, भाजपचे प्रकाशबुवा जवंजाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे नाव घेऊन त्यांनी भाषणाला सुरूवात केली.यावेळी त्यांनी आईसाहेब जिजाऊं, जयंतीदिनी डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांचेही स्मरण केले. पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  हा मतदारसंघ खा.प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा संसदेत पाठवणार आहे. हट्रिक मारून झाली आहे,आता मतदारसंघात एवढी ताकद असल्यावर चौकार सहज मारल्या. मात्र तरीही गाफील राहू नका अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. ज्याच्याकडे बहूमत तोच खरा पक्ष असतो, बाळासाहेबांचा धनुष्यबाण आपल्याकडेच आहे. त्यामुळे आपली खरी शिवसेना आहे असे ते म्हणाले. खरा विश्वासघात ,खरी बेइमानी कुणी केली हे लोकांना माहीत आहे म्हणून एकनाथ शिंदेंनी धाडस केलं. सत्ता सोडण्याचे काम केले, पुढे काय होईल ते माहीत नव्हतं. मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होत की शिवसेना भाजपा युतीच सरकार आल पाहिजे. आधीच्या अडीच वर्षाच्या काळात अनेक लोकोपयोगी कामे बंद करण्यात आली, जलयुक्त शिवार सारखी योजना बंद करण्यात आली होती,मात्र आमचं सरकार आल्यानंतर झपाट्याने कामे मार्गे लागली असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
  सर्वसामान्यांना काय पाहिजे हे हेरून निर्णय घेणार आमचं सरकार..
    हे सरकार काम करणार, हे सरकार ऐकणार, लोकांचं ऐकून निर्णय घेणार सरकार आहे असे ना.शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना १२ हजार रुपये वर्षाला मिळतात, १ रुपयांत पीक विमा काढून देणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ज्येष्ठ नागरिक, महिलांना एसटीमध्ये सवलत दिली. सर्वसामान्यांना काय पाहिजे हे हेरून काम करणार हे सरकार आहे. सरकार आपल्या दारी असे अनेक कार्यक्रम झाले. सरकारी काम सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही पूर्णपणे आम्ही बंद केली, अनेक योजना आम्ही जागेवर पुरवल्या, साडेपाच कोटी लोकांना शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ झाला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्र सरकारने अनेक योजना जनहिताच्या राबवल्या, जे ५० - ६० वर्षात केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची गॅरंटी आता जनेतेने घेतली आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मोदींनी देशात अनेक विमानतळे केली, अनेक रेल्वेमार्ग तयार केले, हर घर नल हर घर जल, उज्वला योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी केला. देशाचा मान जगात वाढला आहे, देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे असे ना.शिंदे म्हणाले.
२०१४ च्या आधी घोटाळे, दंगली, बॉम्बस्फोट होत होते. गेल्या १० वर्षात एकही दंगल झाली नाही. एकही भ्रष्टाचाराचा डाग मोदींवर विरोधकांना लावता आला नाही. देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गरिबांना मोफत वीज, गरिबांसाठी ३ कोटी घरे, महिला बचत गटांना ५० लाखांपर्यंत कर्ज यासह महायुतीच्या जाहीरनाम्यातील गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या. महाविकास आघाडीचे लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत, मला पहा अन् पान फूल वहा अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अवस्था झाल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकार संविधान बदलणार आहे असा आरोप विरोधक करतात. मात्र जी काँग्रेस हा आरोप करते त्याच काँग्रेसने
बाबासाहेबांचा पराभव केल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान कुणीही बदलणार नाही. विरोधक भाजप संविधान बदलणार असल्याचे आरोप करते त्या निव्वळ अफवा आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ना झेंडा ना अजेंडा अशी विरोधकांची अवस्था झाली आहे. मोदींना त्यांनी शिव्या दिल्या. २०१४ आणि २०१९ मध्ये जनतेने त्यांना जागा दाखवली. सगळे इंडीया आघाडीवाले एकत्र येऊन मोदींना हरवण्याचे प्लॅनिंग ते करत आहे. मात्र त्यात विरोधकांना यश येणार नाही. विरोधकांकडे करप्शन फर्स्ट तर मोदींकडे नेशन फर्स्ट आहे. अबकी बार ४०० पार मध्ये प्रतापराव जाधव पहिल्या नंबरवर असले पाहिजे असे ना.शिंदे म्हणाले. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी व गारपीटीची मदत देण्यासंदर्भात लवकरात लवकर अंमलबजावणी होणार असल्याचही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
गुलाबराव पाटील म्हणाले...प्रतापराव २ लाख मतांनी विजयी होतील..
यावेळी बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांनो शांत राहू नका, जोमाने कामाला लगा. ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रतिष्ठेची नाही, देशातल्या ५४४ जागेवर नरेंद्र मोदी उमेदवार आहेत असे समजून मतदान करा. मतदार याद्यांच्या अभ्यास करा, कोण गावाला गेला, कोण आजारी आहे, कोण मतदानाला जाऊ शकत नाही, मतदानाच्या दिवशी कुणाच्या घरी कार्यक्रम आहे याचा अभ्यास करा, मतदारांना बुथवर घेऊन जा असे ना.पाटील म्हणाले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीची जेवढी ताकद आहे त्यावरून १ लाख नाही तर २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने खा.प्रतापराव जाधव विजयी होतील असे ना.पाटील म्हणाले.
खा.प्रतापराव जाधव म्हणाले..
 मागच्या तीन निवडणुकांत अतिशय मेहनत घेऊन आपल्याला खासदार म्हणून पाठवल्याबद्दल खा.प्रतापराव जाधव यांनी मतदारांचे आभार मानले.१५ वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा आपण मतदारांपर्यंत पोहचत असल्याचे ते म्हणाले.पहिली ५ वर्षे मी विरोधातील खासदार होतो, २०१४ पासून तर २०२४ पर्यंत बुलडाण्यात अनेक विकासकामे झाली.आधी फक्त एक नॅशनल हायवे होता त्याची अवस्थाही बिकट होती, दररोज अपघात होत होते. मात्र गेल्या दहा वर्षात जिल्ह्यातील सर्वच महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याचे खा.जाधव म्हणाले.
या १० वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली यावी म्हणून नदीजोड प्रकल्पाची मागणी आम्ही करत होतो. आमच्या प्रयत्नांना यश आले . मागच्या अधिवेशनात राज्य सरकारने वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा प्रकल्पासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, ८८ हजार कोटी रुपयांचा असा हा प्रकल्प आहे. जिल्ह्यातून ८८ किमी जाणारा समृध्दी महामार्ग पूर्ण झाला आहे , मुंबई, नागपूरचे अंतर कमी झाले. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी, दवाखाण्यासाठी त्याचा फायदा होत असल्याचे खा.जाधव म्हणाले. विरोधकांजवळ सांगण्यासारख काही नाही, ज्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही ते आता लोकसभेची निवडणूक लढवत आहेत असे खा.जाधव म्हणाले. जे आम्हाला गद्दार म्हणतात त्यांनीच आधी विचारांशी गद्दारी केली असे ते म्हणाले.अडीच वर्षात मुख्यमंत्री घराबाहेर निघत नव्हते, साधा फोन उचलल्या जात नव्हता, शिवसैनिकांवर अन्याय अत्याचार होत होते, आमदारांना मुख्यमंत्री भेटत नव्हते म्हणून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला,५० आमदारांनी त्यांना साथ दिली. बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी खरी शिवसेना आपली आहे, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे खा.जाधव म्हणाले. जे आमच्यावर गद्दारीचा आरोप करतात त्यांचा इतिहास तपासा. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले, तिकडे सभापती पद, अध्यक्षपद घेतले नंतर माझ्यामागं लागून ते पुन्हा शिवसेनेत आले असा टोला खा जाधव यांनी लगावला. यावेळी रविकांत तुपकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. याच्यापेक्षा मोठा गारुडी आम्ही मेहकरात संपवला आहे असे खा.जाधव म्हणाले.आपल्याकडे सांगण्यासारखी शेकडो कामे आहेत. मतदारसंघात ६ आमदार आपले आहेत, मात्र तरीही गाफील राहू नका, मतदानाची टक्केवारी वाढवा. विजय आपला निश्चित आहे, लाखांच्या फरकाने आपण निवडून येऊ असे खा.जाधव म्हणाले.
आ.डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले
आ.डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, देशाच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची निवडणूक आहे. देशासमोरची आव्हाने कोण पेलू शकत याचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव उत्तर समोर येत, त्यामुळे खा.प्रतापराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करून मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
आ.डॉ.संजय कुटे म्हणाले...
 यावेळी आ.संजय कुटे यांनी खा.प्रतापराव जाधवांना गेल्या तीन निवडणुकांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य द्यायचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, ४०० पारच्या नाऱ्यात बुलडाण्याचे खासदार असले पाहिजे.आपली लढाई महाविकास आघाडीसोबत आहे असेही ते म्हणाले.