'इलेक्शन इस्टोरी मे ट्विस्ट'? लोकसभा उमेदवार बदलण्याचे अमित शहांचे शिंदेंना निर्देश!

बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांना लॉटरी? दिल्लीत निवासस्थानी मध्यरात्री बैठक; यवतमाळ, शिर्डीचेही उमेदवार बदलणार ? दिल्लीत मध्यरात्रीच्या बैठकीत रंगले नाट्य
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात अन तेही सध्याच्या राजकारणात कधी काय होईल याची 'गॅरंटी' नाही. अश्याच धक्कादायक राजकीय घडामोडीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अतिशय विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
  होय! महाशिवरात्रीच्या रात्री लाखो बुलडाणेकर भोले नाथासाठी जागरण करीत असताना तिकडे दूरवरच्या दिल्लीत अमित शहा बाबांच्या दरबारात 'राजकीय जागरण'सुरू होते! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार अन आणखी मोजके भक्तच या जागरण मध्ये सहभागी झाले होते. राजधानी दिल्लीतील केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही गुप्त बैठक पार पडली. भाजपा व शिंदेगटातील जागावाटप व उमेदवार बदलावरून मोठाच तिढा निर्माण झाला आहे. अमित शहांच्या महाराष्ट्र भेटीत देखील न उलगडलेल्या या तिढ्यावर यावेळी साधकबाधक चर्चा करण्यात आली.  
  बुलढाणा, यवतमाळ- वाशीम, शिर्डी मतदारसंघ भाजपला देण्याच्या मागणीवरून शिंदे गट अन भाजपा यांच्यातील संबंध ताणल्या गेले. या पार्श्वभूमीवर ना शहा यांनी जागा बदल ऐवजी उमेदवार बदलाचा पर्याय अथवा फॉर्म्युला सुचविला. खासदार प्रतापराव जाधव, भावना गवळी, यांच्याऐवजी शिंदे गटाच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी द्यावी अशी सुचनाच करून टाकली. बदल केल्यास शिंदे गटाला १२ जागा देण्यावर भाजप तयार असल्याचे समजते.यामुळे बुलढाणा, यवतमाळ च्या वादग्रस्त उमेदवारीचा चेंडू भाजपने शिंदे गटाच्या कोर्टात ढकलल्याने आता मुख्यमंत्री शिंदे यांना काय तो निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. या परिस्थितीत आता बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड यांना बुलडाणा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बुलडाण्याचे आमदार गायकवाड तर यासाठी कधीचेच गळ्यात माळ घालून बसले आहेत! यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो मागे संसदेचे छायाचित्र टाकून जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असा मजकूर टाकला होता. तेंव्हा ती पोस्ट खळबळजनक ठरली होती. अन् खासदार गटही हादरला होता. त्यामुळे आमदारांना वारंवार खुलासे करावे लागले होते. प्रतापराव जाधव जर भाजपच्या सर्व्हेत मागे असतील तर आपणही उमेदवार आहोत, कुठल्याही स्थितीत जागा भाजपला सोडणार नाही अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. आता राजकीय स्थितीमुळे खासदारकीची उमेदवारी आणि दिल्लीचे तिकीट त्यांच्याकडे चालून येत असल्याचे मजेदार चित्र आहे.