इसोलीत संविधान जागर यात्रेचे दमदार स्वागत! आ.अमित झनक यांचा सहभाग;

म्हणाले,संविधानाला पायदळी तुडवणाऱ्यांना धडा शिकवा; राहुल बोंद्रे म्हणाले, कितीही गुन्हे दाखल करा, मी लढणारच....
 
Rb
इसोली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०१४ ला निवडणूक प्रचारात भाजपने अनेक वादे केले मात्र आता "क्या हुआ तेरा वादा" असे म्हणण्याची वेळ आली आहे. काळा पैसा संपवण्यासाठी नोटबंदी केली म्हणे मात्र या नोटबंदीचा मोठा आघात शेतकऱ्यांवर व सर्वसामान्यांवर झाला. संविधानाला मानणारे भाजपवाले नाहीत तर ते संविधानाला पायदळी तुडवणारे आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवा असा घणाघात रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी केला. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात निघालेली संविधान जागर यात्रा आज,२८ जानेवारीच्या रात्री चिखली तालुक्यातील इसोली येथे पोहचली, यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. 
Crowd
पुढे बोलतांना आमदार अमित झनक म्हणाले की, नोटबंदी मुळे गरीब मायमाऊल्यांना त्यांच्या कष्टाची जमापुंजी वाचवण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले. अदानी अंबानी नोटा बदलवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे तुम्ही पाहिले का असा सवाल यावेळी आ.अमित झनक यांनी केला.
कितीही गुन्हे दाखल करा, मी लढणारच: राहुल बोंद्रे
राहुल बोंद्रे म्हणाले की, संविधानाची पालखी आणि लोकशाहीची मशाल घेऊन तुमच्यामध्ये आलो आहे. संविधान आणि लोकशाही आमचा आत्मा आहे. देशातील राज्यातील मनुवादी सरकार पैसा फेकून काहीही विकत घ्यायचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना वाटत पैसा घेऊन काहीही विकत घेता येईल, पण हा त्यांचा भ्रम आहे. पैसा फेकून इमान विकत घेता येणार नाही असे राहुल बोंद्रे म्हणाले. देशातील सत्ताधारी घटना बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे लोकशाही घटना टिकवण्यासाठी सर्वसामान्यांना पुढं यावं लागेल, संघर्ष करावा लागेल असे राहुल बोंद्रे म्हणाले. मी सध्या प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात लढत आहे..ते मी आमदार व्हावा यासाठी नाही तर जे मनुवादी लोक संविधान पायदळी तुडवत आहेत त्यांच्याविरोधात आहे असे ते म्हणाले. उदयनगर मध्ये भूमिपूजन केले म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल केले, याआधी अनेकदा असे गुन्हे दाखल झाले आहेत, मी जेल मध्ये देखील जाऊन आलो आहे..त्यामुळे असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मी लढणार कारण सर्वसामान्य जनता सोबत आहे असे राहुल बोंद्रे शेवटी म्हणाले. याआधी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष विद्याताई खडसन यांनी देशात ईव्हीएम घोटाळा होत असून त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी मागणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर यांनी केले.
 इसोलीत दणकेबाज स्वागत...
संविधान जागर यात्रा आज दुसऱ्या दिवशी मुंगसरी, आमखेड, पाटोदा, भोरसा - भोरसी, पेनसावंगी, नायगांव बु, मंगरूळ नवघरे, सावरखेड या गावांचा प्रवास करून सायंकाळी इसोली येथे पोहचली. आ.अमित झनक आज दुपारी ४ वाजेजासून यात्रेत सहभागी होते. इसोलीत फटाके फोडून, पुष्पवर्षाव करून व ढोल ताशांच्या गजरात यात्रेचे दिमाखदार स्वागत करण्यात आले.