BREAKING शेजारी मुलीवर ठेवली पापी नजर ; घरात घुसून केला विनयभंग! वासनांध तरुणाला न्यायालयाचा दणका..
Jun 7, 2024, 18:49 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची
शिक्षा आज ७ जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी ठोठावली.
पोलिसांत पिडीत मुलीनी तक्रार दिली त्यावेळी ती १६ वर्षाची होती. याबाबत १४ मार्च २०१९ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. ९ व्या वर्गात शिकत असलेल्या पिडीत अल्पवयीन सोबत १३ मार्च २०१९ अतिशय वाईट घटना घडली. घराशेजारी राहणारा आरोपी प्रविण प्रल्हाद खिल्लारे (२७ वर्ष) हा रात्रीच्या १० वाजता पिडीत मुलीच्या घरात शिरला. आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळी पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला तर आरोपीने तिला जिवाने मारून टाकण्याची धमकी दिली. परंतु पिडीतेचा आवाज ऐकूण पिडीतेची आई व शेजारील लोक धावत आले. तिच्या दोन बहिणी देखील झोपेतून जाग्या झाल्या तेव्हा आरोपी तेथून पळून गेला होता. दरम्यान, घटनेचे वेळी पिडीता ही रात्रीचे वेळी आपल्या घरामध्ये अभ्यास करत होती. तसेच आरोपी हा त्याचे लग्न झालेले असतांना देखील पिडीतेशी विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करीत असे व सतत तिचा पाठलाग करीत होता. असे पिडीतेने तकारीत नमुद केले होते.
तक्रारीवरून आरोपी विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ अन्वये नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपासाअंती आरोपीविरूध्द दोषारोपपत्र पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ यांनी बुलढाणा येथे विद्यमान न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र वि. न्यायालयात दाखल झाल्यानंतर प्रकरण बुलढाणा येथील विशेष न्यायाधीश श्री. आर.एन. मेहरे सर यांचे न्यायालयात वर्ग करण्यात आले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. यामध्ये पिडीता, पिडीतेची बहिण, आई, पंच साक्षीदार अमोल बडगे, पिडीतेचे वयाबाबत संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक शंकर डुकरे, पिडीतेचे जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डीग करणारे पोलीस शिपाई महादेव निनाजी इंगळे व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ यांच्या साक्षींचा समावेश आहे. सर्व साक्षीदारांच्या साक्षी घटनेशी सुसंगत व एकमेकांना पुरक असल्याकारणाने महत्वपूर्ण ठरल्या. सदर प्रकरणात बचाव पक्षातर्फे देखील बचावाच्या दोन साक्षीदारांचे (आरोपी स्वतः व अन्य एक ) पुरावे विद्यमान न्यायालयात नोंदविण्यात आले.सरकार पक्षातर्फे नोंदविण्यात आलेल्या सदरहू साक्षीदारांच्या साक्षीपुराव्याच्या आधारे विद्यमान न्यायालयाने आरोपीला वरील सर्व कलमांअंतर्गत दोषी ठरवून कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सश्रम कारावास, कलम ८ अंतर्गत ४ वर्ष सश्रम कारावास व कलम ५०६ साठी २ वर्ष सश्रम कारावास व एकुण ६००० रू. दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीस सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायचे आहे. दंडाच्या रकमेपैकी ५ हजार पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याबाबत व अधिकच्या नुकसान भरपाईसाठी न्यायनिर्णयाची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे पाठवित असल्याचे विद्यमान न्यायालयाने न्यायनिर्णयात नमुद केले. सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी योग्य प्रकारे सांगड घालून सरकार पक्षाची बाजु न्यायालयासमोर मांडली. स. फौ. किशोर कांबळे, पो.स्टे. बुलढाणा शहर यांनी कोर्ट पैरवी म्हणून पुर्णपणे सहकार्य केले.