एक मिस्ड कॉल अन् मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय मदतीसाठी मिळते २ लाखांपर्यंतची मदत! कशी आहे सर्व प्रोसेस? जाणून घ्या....
Aug 17, 2024, 10:00 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळत आहे. विशेष म्हणजे या मदतीसाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाही. राज्यातील कोणताही नागरिक फक्त एक मिस्ड कॉल देऊन व आपल्या मोबाइल वरून फॉर्म भरून ही मदत मिळवू शकतो. २० गंभीर आजारांवर ही मदत मिळते अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली. काल,१६ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विभागीय प्रमुख अमर राऊत यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधीतून आतापर्यंत राज्यातील ३७ हजार तर बुलढाणा जिल्ह्यात ६१२ रुग्णांनी लाभ घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेच्या प्रचारासाठी राज्यात ‘आरोग्यवारी’ सुरू असून ती वारी काल बुलडाण्यात आली होती.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्याव्या, गोरगरीब जनतेला आर्थिक सहाय्य मिळावे या हेतूने १ ऑगस्ट पासून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातर्फे राज्यात आरोग्यवारी काढण्यात आली आहे. राज्यात २ वर्षात ३०० कोटींचा वैद्यकीय सहाय्यता निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये एकूण २० गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. लहानमुलांच्या आजारात तसेच प्रत्यारोपण शस्तक्रियेसाठी २ लाखापर्यन्त मदत निधी मिळत आहे. अपघाती उपचारासाठी एका लाखापर्यन्त मदत मिळत आहे. कॅन्सर, मेंदूचे आजार अशा गंभीर आजारांसाठी या योजनेतून आर्थिक सहाय्य मिळत आहे. असे मदतकक्ष प्रमुख राऊत यांनी सांगितले.
‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
योजनेचा लाभ घेण्यासाठी ८६५०५६७५६७ ह्या टोलफ्री क्रमांकावर मिस्ड् कॉल करावा लागणार आहे. त्यानंतर
एक लिंक प्राप्त होईल, त्या लिंकवर फॉर्म भरून पुढील प्रक्रिया करावी. अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, रेशनकार्ड, संबंधित रुग्णालयाचे पत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
जिल्ह्याला मिळाले ६ कोटी २५ लाखांचा निधी
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत ६१२ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठी ६ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.