तुपकर समर्थकांच्या गर्दीने शेगावात गाठला विक्रमाचा कळस! पालखी व प्रकटदिन उत्सवाशिवाय एवढी गर्दी कोणत्याच रॅलीला झाली नाही! रविकांत तुपकरांच्या वादळाने अख्खे शेगाव व्यापून टाकले;

तुपकर म्हणाले,येणारे दोन दिवस डोळ्यात तेल घालून काम करा!
 
Fdfk
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी बुलडाण्यातील विक्रमी रॅलीने पाया रचल्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविकांत तुपकर समर्थकांच्या गर्दीने संत नगरी शेगावात गजानन महाराजांच्या आशिर्वादाने विक्रमाचा कळस रचल्याचे दिसून आले. संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव आणि पालखी सोहळ्याशिवाय एवढी गर्दी शेगावात कधीच जमली नाही, हेच वाक्य ही रॅली पाहणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी होते. या रॅलीत शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांसह तरुण, महिला, अल्पसंख्याक समाज तसेच सर्वच समाजघटकातील नागरिक, वयोवगृद्ध नागरिक, लहान-मोठे व्यापारी, शहरातील मध्यमवर्गीय जनता असे सर्वच स्तरातील लोक एकत्र आले होते. परिवर्तनाचा इतिहास घडविणारी ही रॅली ठरली. कुणी नारेबाजी करत होते, कुणी ढोल ताशाच्या निनादात उत्साहाने नाचत होते, कुणी हात जोडत होते, कुणी आशिर्वाद मागत होते, या रॅलीत सहभागी असलेल्या प्रत्येकामध्ये प्रचंड उत्साह आणि विजयाचा ठाम विश्वास दिसून येत होता. रणरणत्या उन्हातही प्रचंड जोशात निघालेल्या रॅलीने आणि रेकॉर्ड ब्रेक सभेने विजयाची गुढी रोवली. सर्वसामान्यांचे हे प्रेम आणि विश्वास व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत आजवर समर्थपणे साथ दिली आता पुढचे दोन दिवस डोळ्यात तेल घालून काम करा, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित घटक, तरुण, सर्वसमाज घटकातील जनसामान्यांचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विजयाची प्रार्थना केली व त्यानंतर गांधी चौकातून या विक्रमी प्रचार रॅलीला सुरुवात झाली. शेगावातील रस्ते कमी पडत होते एवढी मोठी गर्दी या रॅलीत पहावयास मिळाली, रविकांत तुपकर नावाच्या वादळाने अख्खे शेगाव व्यापून टाकले होते. कॉटन मार्केट जवळील प्रशस्त खुल्या मैदानात झालेल्या या सभेत नजर जाईल तिकडे गर्दीच गर्दी दिसून येत होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला थांबविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, डझनभर मंत्री, एवढेच काय हिरो देखील आणावा लागला, यावरुनच सर्वसामान्यांची ताकद दिसून आली. पंतप्रधान मोदी सांगतात आत्मनिर्भर व्हा, परंतु खासदारांना १५ वर्षांत आत्मनिर्भर होता आले नाही. स्वत:चे असे एकही ठोस काम त्यांना सांगता येत नाही, प्रत्येक वेळी मोदींच्याच नावाने ते मत मागत आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना दोनदा जिल्ह्यात येऊन गल्लीबोळात फिरावे लागले, हा शेतकऱ्यांचा विजय आहे, शेतकरी माय-बापाचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. शेगावात विमानतळ झाले पाहीजे, सिंदखेड राजा, लोणार, संत चोखामेळा, सैलानी यासारख्या ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा विकास झाला पाहीजे, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात आले पाहीजे, शेतमालाला योग्य दर मिळाला पाहीजे, यासाठी सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस संसदेत पाठवा, असे आवाहन तुपकरांनी केले. 
 विरोधक माझे आई - वडिल, पत्नी आणि अगदी लहान मुलांवर देखील घाणेरडे आरोप करतात, यावरुन त्यांची पातळी किती घसरली हे दिसून येते. 
अगदी सुरुवातीपासूनच घरच्या भाकरी खाऊन, स्वत:चे पैसे खर्च करुन गावगाड्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला तसेच शहरी भागातील नागरिकांनी माझ्या प्रचारासाठी दिवसाची रात्र केली त्यांचा मी आयुष्यभर ऋृणी राहील. माझ्या विरोधात बोलायला काही नाही म्हणून चुकीचे आरोप करतात, माझ्या सहकाऱ्यांना धमक्या देता, दबाव टाकतात हे सर्व प्रकार बंद करा, कुणीही त्यांच्या दबावाला बळी पडू नका, मी प्रत्येकासाठी छातीचा कोट करुन उभा राहील, अशी ग्वाही देखील तुपकरांनी दिली. आजवर ग्रामीण व शहरी भागातील सर्वच घटकातील नागरिकांनी साथ दिल्यामुळेच आज आपण सर्वात समोर असून विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, आता पुढील दोन दिवस डोळ्यात तेल घालून काम करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले.
         
  गजाननाच्या पावनभूमीत सांगतो मी कुठेच जाणार नाही. जिल्हाभरात सर्वच स्तरातून आणि सर्वच समाजातून मला मिळत असलेले पाठबळ, समर्थन आणि आशिर्वाद पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी खोटे आरोप लाऊन पाहले, अफवा करुन पाहिल्या परंतु आता जनतेवर फरक पडत नसल्याचे लक्षात आल्याने ते म्हणतात निवडूण आल्यावर तुपकर तिकडे जाईल, ईकडे जाईल परंतु तसे कधी होणार नाही. गेली २२ वर्षे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, तरुण, शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, जुनी पेन्शन धारक संघटना, ईपीएस संघटना, अतिक्रमण धारक, फळविक्रेते, लघु उद्योजक, महिला बचत गट या सर्व घटकांसाठी मी संघर्ष केला. अनेक गुन्हे अंगावर घेतले, पोलिसांचा मार सहन केला, तडीपार झालो, तरुंगात गेलों परंतु कोणत्याच पक्षात गेलो नाही आणि यापुढेही कुठेच जाणार नाही, मी सर्वसामान्य जनतेचा उमेवार आहे सर्वसामान्य जनताच माझा पक्ष आहे, संत गजानन महाराजांच्या पावन भूमित जाहीर सांगतो मी कुठेच जाणार नाही, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.
विरोधकांना स्वप्नातही मीच दिसतो...
युती आणि आघाडीच्या दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांकडून फक्त मलाच टार्गेट केले जात आहे. विरोधक सगळीकडे माझ्याच नावाचा जप करीत आहेत. यांना माझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. विद्यमान खासदारांना तर माझ्या नावाचा कावीळ झाला आहे, त्यांना स्वप्नातही मीच दिसतो आहे, असे रविकांत तुपकरांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.