तुम्ही आमचे घ्या,आम्ही तुमचे घेतो..! चिखलीत फोडाफोडीचे राजकारण! काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात, भाजपचे काँग्रेसमध्ये!

 
hjgj
चिखली(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्लीच्या राजकारणात नेतेच एकनिष्ठ राहत नाही म्हटल्यावर कार्यकर्ते तरी कसे राहतील..त्यामुळे आता पक्ष बदलण्याचा सपाटा कार्यकर्त्यांनी सुद्धा सुरू केलाय. अर्थात एखाद्या पक्षात प्रवेश करणारे आधी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतातच असे नाही मात्र प्रवेश करून घेणारा नेता मात्र ते "त्या" पक्षातून आपल्याकडे आल्याचा दावा  ठोकत असतो..अर्थात हे सगळ भारुड सांगण्याच कारण एवढेच की चिखलीत राहुल बोंद्रेच्या नेतृत्वात काहींनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणारे भाजपचे पदाधिकारी अन कार्यकर्ते होते असा दावा भाऊंचा आहे. त्यांच्या कार्यालयाकडून तशी प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भरमसाठ कार्यकर्त्यांनी आ. श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केल्यानंतर आता भाऊसुद्धा प्रवेश घडवून आणत असल्याचे बोलले जात आहे.

 गेल्या आठवड्यात चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांत ताईंच्या नेतृत्वात भाजपमध्ये  प्रवेश झाला. चिखलीतही राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाला खिंडार पडले.  त्यानंतर आता भाऊसुद्धा अग्रेसर झाले आहेत.  भाजपा युवा मोर्चाचे तालुका सचिव(?) आकाश शेळके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय सोमठाना, गोंधनखेड, करवंड येथील कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रवेश करणारे कार्यकर्ते याआधी भाजपचे होते असा दावा काँग्रेसचा आहे. चिखली तालुक्यात सध्या पक्षप्रवेश सुरु असल्याने नेते कार्यकर्त्यांची अदलाबदल करीत असल्याची चर्चा आहे. एकंदरीत तुम्ही आमचे कार्यकर्ते घ्या आम्ही तुमचे घेतो असे फोडाफोडीचे राजकारण चिखलीत सुरू आहे.