खासदार जाधवांच्या एन्ट्रीने अनेक पदाधिकाऱ्यांवर जुन्या पोस्ट डिलीट करण्याची पाळी! काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, निम का पत्ता कडवा है..! आता म्हणतात, तुम्ही बांधाल तेच तोरण..!!

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रंग बदलणाऱ्या सरड्याला सुद्धा हेवा वाटावा इतपत राजकारणात रंग बदलणाऱ्या नेत्यांची अन् कार्यकर्त्यांची संख्या वाढलीय. आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन बंड केल्यानंतर  चिखली आणि बुलडाण्यात या बंडखोर (उठाव करणाऱ्या) आमदारांविरोधात तीव्र संताप होता. त्यांना गद्दार संबोधल्या जात होते..अगदी निम का पत्ता कडवा है ....इतक्या खालच्या थरावर जाऊन  आपण किती निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र काल, खासदार जाधव शिंदेगटात गेल्यानंतर मात्र या तथाकथित निष्टावंतावर जुन्या पोस्ट आणि व्हिडिओ डिलीट करण्याची वेळ आलीय. "आता तुम्ही बांधाल तेच तोरण अन् तुम्ही ठरवाल तेच धोरण.." अशा पोस्ट आठवडाभरापूर्वी बाकीच्यांना गद्दार संबोधणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.

हल्लीच्या राजकारणात विचारांपेक्षा , तत्वांपेक्षा व्यक्तीपूजेला जरा जास्तच महत्व दिल्या जात असल्याचे चित्र आहे. राजकीय महत्वाकांक्षा असणारे लोक राजकारणात "गॉडफादर" शिवाय वावरत नाहीत. त्यामुळे विचार, तत्व, निष्ठा या केवळ भाषणातल्या पोकळ गोष्टी झाल्यात. नेता (गॉडफादर) म्हणेल ती पुर्वदिशा अशी अलीकडच्या राजकारणातील कार्यकर्त्यांची अन् नेत्यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची दशा (दुर्दशा?)झालीय. त्यामुळे नेत्याने भूमिका बदलली की कार्यकर्ते सुद्धा भूमिका बदलतात. 

पूर्वी कार्यकर्त्यांचा विचार घेऊन सल्लामसलत करून नेते आपली भूमिका ठरवायचे आता आधी भूमिका घ्यायची अन् नंतर कार्यकर्त्यांना सांगायचे अशी पद्धत रूढ झालीय..! बर ते जाऊद्या..मुद्दा असा आहे की, हिंदुत्वासाठी आणि मतदारसंघातील लोकांची अधिक गतीने सेवा करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव आता शिंदेगटात गेले आहेत. खासदार प्रतापराव जाधवांचे जिल्ह्यातील समर्थक काही दिवसांपासून संभ्रमात होते,तो संभ्रम आता दूर झालाय..

पण खासदार साहेबांनी कार्यकर्त्यांना जर आधीच आपली स्पष्ट भूमिका सांगितली असती तर कार्यकर्त्यांनी "निम का पत्ता कडवा है" च्या घोषणा दिल्या नसत्या अन् शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटले नसते! आता शिवसेनेच्या नव्हे खासदार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते असणाऱ्या त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांवर जुन्या पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढवलीय एवढं मात्र खरय..!!