कुणाचा दावा किती खरा किती खोटा? जो - तो म्हणे गुलाल आमचाच! जिल्हावासियांनो तुम्हीच ठरवा गुलाल कुणाचा? काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी,
माजी आ.शशिकांत खेडेकर, नरेंद्र खेडेकर,आ.संजय गायकवाड निवडणूक निकालांवर काय म्हणालेत वाचा..!
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणतात, हा भारत जोडो यात्रेचा परिणाम..
जिल्ह्यातल्या १८० पैकी जास्त ग्रामपंचातींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सुद्धा विजय मिळवला असल्याचा दावा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे. भारत जोडो यात्रेचा परिणाम या निवडणुकींच्या निकालांवर दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. सरपंचपदासोबतच निवडूण आलेले ग्रामपंचायतींचे जास्तीत जास्त सदस्य हे काँग्रेसचे असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले. चिखली विधानसभा मतदार संघात येणाऱ्या चिखली तालुक्यातील २८ पैकी तब्बल २२ गावांच्या सरपंच पदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तर चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील ५ पैकी ३ गावांच्या सरपंचपदी काँग्रेस तर एका गावाच्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले. चिखलीच्या आमदारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या उदयनगर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे मनोज लाहुडकर १५०० मतांनी विजयी झाल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात ९१ सरपंच निवडून आले; महाविकास आघाडीलाही मोठे यश ;जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचा दावा..!
आज जाहीर झालेल्या निवडणूक निकलांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९१ सरपंच विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला आहे. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा मोठे यश मिळाल्याने महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिल्ह्यात जवळजवळ २०० गावांच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत यश मिळवल्याचे ते म्हणाले. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या ५६ पैकी ४० जागांवर आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात दमदार विजय मिळाल्याचेही नाझेर काझी म्हणाले.
माजी आमदार शशिकांत खेडेकर म्हणतात, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ४५ जागांवर आमचा विजय..!
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात ४५ जागांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरपंच विजयी झाल्याचा दावा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ पैकी १० , सिंदखेडराजा तालुक्यातील ३० पैकी २० सरपंच बाळासाहेबांच्या शिवसेना व भाजपा युतीचे निवडून आल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला देऊळगाव राजा तालुक्यात केवळ ५ ठिकाणी विजय मिळाल्याचे शशिकांत खेडेकर म्हणाले..!
नरेंद्र खेडेकरांचे खा. प्रतापराव जाधववांना चॅलेंज..!
खा. प्रतापराव जाधव यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा युतीला २०० जागांवर विजय मिळेल असा दावा केला होता, हा दावा फोल झाल्याचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर म्हणाले. खा. जाधवांनी त्यांच्या निवडून आलेल्या सरपंचांची यादी जाहीर करावी. घाटाखाली ७ तालुके आहेत, ७ तालुक्यात त्यांचे ७ सरपंच तरी जिंकले का? करा यादी जाहीर.. असे खुले आव्हान नरेंद्र खेडेकरांनी दिले. जिल्ह्यात शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच वरचष्मा असल्याचा दावाही नरेंद्र खेडेकरांनी केला.
आमदार संजय गायकवाडांचा दावाही वाचा..!
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या २३ पैकी १५ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे सरपंच विजयी झाल्याचा दावा आ. संजय गायकवाडांच्या वतीने करण्यात आला आहे. बुलडाणा आणि मोताळा तालुक्यात येणाऱ्या २३ पैकी १५ ग्रामपंचायतींचे सरपंच आमचेच असा दावा आ. गायकवाडांच्या वतीने करण्यात आला आहे.