कोण म्हणत जिल्ह्यातली सगळी शिवसेना खा. जाधवांसोबत? घाटाखाली शिवसैनिक एकवटले म्हणाले..आता बंडखोर प्रतापराव जाधवांचा पराभव निश्चित!
शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी काल, पत्रकार परिषदेत घाटाखालील सगळे शिवसैनिक आता खा. जाधव यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती. मात्र मोजक्या लोकांना सोबत घेऊन शांताराम दाणे यांनी ही घोषणा केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांनी केला. पक्ष संकटात असताना प्रतापराव जाधव पक्षप्रमुखांना सोडून गेले त्यामुळे जनता आता पुढील निवडणुकीत त्यांना उत्तर देईलच. घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर , मलकापूर , नांदुरा या तालुक्यांतील सामान्य शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे.
भाजपने शिवसेना संपविण्याचा डाव रचला आहे असेही दत्ता पाटील यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी खा. जाधव यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे अशा गगनभेदी घोषणा उपस्थित शिवसैनिक देत होते. या पत्रकार परिषदेला जळगाव जामोद चे तालुकाप्रमुख, संग्रामपूर तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.