धृपदराव कुठंय हो सध्या? आहे भाजपात की गेले दुसरीकड कुठं....

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)- माजी आमदार धृपदराव सावळें कुठंय हो सध्या..? काय माहित भो... मले काही दिसले नी अशात.. आत्ता आत्ता ते भाजपचे जिल्हाध्यक्ष व्हते तव्हा अख्खा जिल्हा पायाखाली घालायचे..आता भाजपात आहे की आणखी दुसरीकंड गेले कुठं काही समजून नी राह्यल..थांबा थोडं ..निवडणुका लागल्या की कळल आपोआप कुठ गेले ते..

gode

बुलडाणा शहरातल्या एका चहाच्या टपरीवर दोन जुन्या जाणत्या लोकांच्या अशा गप्पा रंगल्या होत्या. बहुतेक तालुक्यातल्या एका गावातून तहसील कार्यालयात ते कामासाठी आले असावेत असं त्यांच्या बोलण्यावरून वाटत होत... बर ते जाऊद्या..पण ते लोक जे बोलत होते ना आपल्या धृपदरावांबद्दल ते  शंभर टक्के खर होत बरका..

भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर भाऊंच दर्शन अगदीच दुर्मिळ झालय म्हणा..ते काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती पण तसे काही झाले नाही..मात्र ते भाजपात आहेत असेही काही दिसत नाही.. भाजपच्या नेत्यांचा वाढदिवस आल्यावर बॅनरवर कोपऱ्यात त्यांचा फुटू दिसतो..पण पक्षाच्या कार्यक्रमात मात्र  भाऊ काही दिसत नाही..

त्यांची काय नाराजी हे त्याह्यच त्याह्यलेच माहीत..मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते सक्रिय होतात का? झाले तर ते कुठल्या पक्षाच्या बाजूने राहतील..कुणाचा प्रचार करतील असा प्रश्न भाऊंच्या कार्यकर्त्यांना नक्कीच पडला असेल..

आधी काँग्रेस नंतर चिखली विधानसभेसाठी राष्ट्रवादी अन् त्यानंतर भाजप असा अनुभवी भाऊंचा राजकीय प्रवास राहिलाय..भाजपने तर आल्या आल्या त्यांचा सन्मान करून थेट संघटनेच पद दिलं.. भाजपात सहसा तस होत नाही..नव्या माणसाला एकदम संघटनेच मोठ पद देत नाहीत ..

पण धृपदरावांसाठी भाजपने बऱ्याच अटी तव्हा शिथिल केलत्या..त्यांनी पण मग जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा अक्षरशः पिंजून काढल्या..जिल्हाभर भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरले..पण जसे अध्यक्षपद गेलं तसे भाऊ गायबच झाले..त्यामुळे कार्यकर्ते विचारून राह्यले धृपदराव कुठंय हो सध्या? आहे भाजपात की गेले कुठ...?