भाजपच्या गोटात चाललंय तरी काय? रावसाहेब नंतर आता 'ताईसाहेब' जिल्ह्यात!

 
546
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जेमतेम आठवड्यापूर्वी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे जिल्ह्यात येऊन गेले आणि आता पुन्हा एक केंद्रीयमंत्री जिल्ह्यात येत आहे. यामुळे भावी लोकसभा रणसंग्रामासाठी भाजप तयार होत आहे असा राजकीय तर्क व्यक्त होत असला तरी भाजपच्या गोटात चाललंय तरी काय? अशी प्रश्नवजा राजकीय उत्सुकता विरोधकांमध्ये उपस्थित झाली आहे

सन २०२४ च्या लोकसभा रणसंग्रामाची तयारी भाजपने आत्तापासूनच चालविली आहे. त्यासाठी जिल्हा निहाय प्रभारी नेमण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे  राजकारण व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना ओळखून असणारे ना. दानवे पाटील यांच्यावर बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी १३ एप्रिलला प्रभारी या नात्याने दिलेली पहिली भेट प्रभावित करणारी ठरली होती.

 या भेटीची चर्चा अजून सुरू असतानाच आणखी एक केंद्रीय मंत्री बुलडाणा जिल्ह्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज   जिल्ह्यात येत आहे. त्यांचा दौरा चिखली व धाड पुरताच मर्यादित असला तरी आज, २१ एप्रिलला त्या रात्री चिखली मध्ये मुक्कामी आहेत. त्या अगोदर त्या विमानाने दिल्लीहून औरंगाबादला संध्याकाळी दाखल होऊन चिखलीमध्ये  त्यांचे आगमन होणार आहे.

प्राप्त माहितीनुसार धाड येथील कार्यक्रम तोरणा महिला अर्बनच्या उद्घाटनाचा व चिखलीतील कार्यक्रम आरोग्यविषयक असला तरी केवळ यासाठी ना. पवार इतक्या दुर येण्यामुळे विरोधकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकने स्वाभाविक आहे. यामुळे या दौऱ्याकडे  विरोधकांचेही 'कान 'लागले आहे.