ग्रामपंचायती झाल्या, नगरपरिषद अन् जिल्हापरिषद निवडणुकांचे काय? किती दिवस प्रशासकाच्या हाती कारभार! इच्छुक उमेदवार वाट पाहून पाहून थकले

 
sapkal
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकत्याच जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. निवडणूक विभागाच्या चोख नियोजनामुळे बोटावर मोजण्याइतका अपवाद वगळता सर्वच ठिकाणी निवडणुका शांततेत आणि शिस्तीत पार पडल्या. गावपातळीवरच्या निवडणुका होऊ शकतात तर मग नगरपालिका अन् जिल्हापरिषदांच्या का नाही ? असा प्रश्न आता अनेकांना पडलाय. नगरपरिषदांवर प्रशासक राज येऊन आता जवळपास वर्ष होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येऊन १० महिने होतायत. लोकप्रतिनिधिंचा धाक नसल्याने प्रशासक स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागत असल्याचा आरोप होतोय. मात्र असे असले तरी सरकार निवडणुका घ्यायला का टाळाटाळ करीत आहे असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय.

नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांची सर्वच तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती. प्रभाग रचना, मतदार यात्री प्रसिद्ध आणि आरक्षण सोडत सगळ काही झाल्यानंतर आता फक्त निवडणुका घोषित होण्याची वाट इच्छुक उमेदवार आणि निवडणूक विभाग पहात होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर निवडणूक यंत्रणेच्या मेहनतीवर पाणी फेरल्या गेले. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, जिल्हापरिषदेच्या गटात झालेली वाढ सर्व काही रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय शिंदे - फडणवीस सरकारने घेतला. अर्थात न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर स्थगिती दिलेली असली तरी पुढे त्याचे काय झाले या प्रश्न अनुत्तरीत आहे.
   
 पुढे काय?

  जुनी रचना सरकारने रद्द केली असली तरी निवडणूक यंत्रणेला नव्याने तयारी करण्याचे आदेश अद्याप आलेले नाहीत. २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ६० गटांत झालेल्या होत्या. आताही तशाच पद्धतीने झाल्या तर याआधी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द होऊन नव्याने आरक्षण सोडत निघेल, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढू शकते. शिवाय आधी झालेल्या आरक्षण सोडतीत ज्या इच्छुकांची नाराजी झाली त्यांच्या आशा आता पुन्हा पल्लवित होऊ शकतात, हीच बाब नगरपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांना सुद्धा लागू होते. एकंदरीत जेव्हा शिंदे  - फडणवीस यांच्या मनात येईल तेव्हाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे एकंदरीत चित्र आहे. मात्र निवडणुका अधिक काळ लांबणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याने न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा असे आता राज्यशास्त्राचे अभ्यासक बोलू लागले आहेत.