काय राव! जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ६ आमदारांची दांडी; आ.कुटे आजारी! फुंडकर पक्षाच्या बैठकीला मुंबईत; आ. एकडे "पर्सनल" कामासाठी मुंबई दौऱ्यावर;

रणजित पाटील म्हणाले माझ्याकडे ५ जिल्हे; वसंत खंडेलवाल ट्रेनिंगला, तर आ.डॉ शिंगणे मुंबईत..

 
vgj
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा  लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातल्या राजकीय गोंधळानंतर आज, १० नोव्हेंबरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. जिल्ह्यासाठी ४४० कोटींचा निधी यावर्षी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. मोठ्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच तब्बल १० महिन्यानंतर ही बैठक पार पडली. मात्र बैठकीला अपेक्षित असलेल्या १० आमदारांपैकी तब्बल ६ आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. जिल्ह्याच्या भागौलिक क्षेत्रात येणारे २ खासदार या बैठकीला उपस्थित होते.

 विधानसभेचे ७ आणि विधानपरिषदेचे ३ असे एकूण १० आमदार या बैठकीला अपेक्षित होते.  मात्र चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, मेहकरचे आमदार रायमुलकर, बुलडाण्याचे आ. गायकवाड व विधानपरिषदेचे आ.किरण सरनाईक वगळता इतर सर्व आमदार मात्र या बैठकीला गैरहजर होते. जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील सोनाळा येथील यात्रेत हजेरी लावली. त्यानंतर ते आजारी पडल्याचे सांगण्यात आले. खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची मुंबईत बैठकीत होती. त्यासाठी मुंबईत आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काल, झालेल्या नियोजन समितीच्या लघु बैठकीला हजर होतो. मतदारसंघातील कामासंदर्भात पालकमंत्र्यांशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले. मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांच्याशी संपर्क साधला असता, "पर्सनल" कामासाठी मुंबईत आल्याचे ते म्हणाले, मतदारसंघातील कामासंदर्भात पालकमंत्र्यांशी बोलणे झाल्याचे राजेश एकडे म्हणाले. आ. डॉ. राजेंद्र शिंगणे हे मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

 दरम्यान विधानपरिषद आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "आज सगळ्या आमदारांना ट्रेनिंगसाठी मुंबईला बोलावण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठीकाचा निरोप ४ दिवसांआधी मिळाला, आमचे कार्यक्रम आधीच ठरलेले होते. मात्र पालकमंत्र्यांशी "निधी" संदर्भात बोलणे झाल्याचे ते म्हणाले". पदवीधर मतदार संघाचे आमदार रणजित पाटील म्हणाले की, मी ५ जिल्ह्यांचा आमदार आहे, ५६ तालुके आहेत. अनेक कार्यक्रम आधी ठरलेले असतात. आज ,अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील पूर्वनियोजित कार्यक्रमाला उपस्थित होतो,त्यामुळे बुलडाण्याच्या बैठकीला येणे जमले नसल्याचे ते म्हणाले.