आमदार संजय कुटेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; एसपींकडे कारवाईची मागणी! वाचा प्रकरण नेमके आहे तरी काय....

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. संजय कुटे हे भाजप पक्षाचे आहेत. महापुरुषांचा अपमान भाजप नेते वारंवार करीत असून, डॉ. संजय कुटे यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांच्या वडिलांचा फोटो बाबासाहेबांच्या प्रतिमेसोबत लावून अवमान केला आहे. त्यामुळे कुटे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचितने आज ,१३ डिसेंबरला  जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,
गेल्या वर्ष भरापासून सातत्याने भाजपाचे मंत्री,नेते,आमदार यांच्याकडून महापुरुष यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्या जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असून निंदनीय आहे. भाजपाला सत्तेची नशा चढली असून ते जाणीवपूर्वक चुकीची विधाने करीत आहेत. देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये आर.एस.एस. व भाजपा सामाजिक वातावरण बिघडविण्याचे काम करीत असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ह्या संघटना करीत आहे. या मगरूर सत्ताधाऱ्यांकडून  हुकुमशाही गाजवून राज्यात अराजकता निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणे असे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. 

अशातच बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री आणि विद्यमान जळगांव जामोद या मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी मागील आठवडयात ६ डिसेंबर रोजी त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी संपन्न करतांना, त्याच दिवशी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतांना, आमदार डॉ.संजय कुटे यांनी कार्यक्रमामध्ये त्यांच्या वडिलांच्या फोटोसोबत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बरोबरीत लावून संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना एक प्रकारे अवमानीत करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे आंबेडकरी व बहुजन अनुयायी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अशा कृत्याचा धिक्कार करणे आवश्यक आहे. त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार संग्रामपूर व ठाणेदार जळगांव जामोद यांना देण्यात आले होते. परंतू सदरच्या निवेदनावर कोणत्याच प्रकारची ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वरील बाबींची गंभीर दखल घेवून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी. कुटे यांनी याबाबत माफी मागून खुलासा करावा अन्यथा डॉ.संजय कुटे यांचे निवासस्थानावर २३ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी आक्रोश मोर्चा काढणार अशा इशाराचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

  निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते प्रशांत वाघोदे, जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव, बुलडाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, तालुका संघटक अरुण सरदार, शहर महासचिव दिलीप राजभोज, विजय राऊत, सदस्य राजू वानखेडे, नंदकिशोर माळी, अमोल गवई, जमील शाह, संदीप लहाने, अमोल राजमाने, भागवत दांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.