केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पुढच्या अठरा महिन्यांत ६ वेळा येणार जिल्ह्यात! प्रत्येक दौऱ्यात ३ दिवसांचा मुक्काम!
बुलडाणा लोकसभेवर भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती तयार! खा. जाधवांच्या अडचणी वाढणार

शिवसेनेने तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदारकीसाठी प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिली. मात्र हिंदुत्वाचा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा असे म्हणत दोन आमदार शिंदेगटात गेल्यानंतर आणि "हिंदुत्व खतरेमे है" ची जाणीव झाल्यावर खासदार जाधव सुद्धा शिंदेगटात सामील झाले. आमच्यासोबत आलेल्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याने २०२४ चा खासदार मीच असा आत्मविश्वास खा. जाधवांना असला तरी बुलडाणा लोकसभेची तयारी राज्यातल्या सत्तांतराच्या कितीतरी आधीपासून भाजपने सुरू केली होती हे विसरून चालणार नाही. आतापर्यंतच्या तयारीवर पाणी फेरण्याची भाजपच्या नेत्यांची अन कार्यकर्त्यांची इच्छा नाही. त्यामुळेच बुलडाणा लोकसभेची जागा पटकावण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती राबविण्याच्या सूचना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे समजते.
निवडणुकीचे सूक्ष्म प्लॅनिंग करण्यात भाजपा इतर पक्षांपेक्षा नेहमीच चार पावले पुढे आहे. या नियोजनात माहिर असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पुढच्या १८ महिन्यात सहा वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. प्रत्येक दौऱ्यात त्यांचा ३ दिवस मुक्काम बुलडाणा लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघात ते प्रवास करणार आहेत. केंद्र सरकारच्या योजना सामान्य नागरीकांपर्यंत पोहचल्यात का, कुणाला योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी आहेत का याची तपासणी ते थेट ग्रामीण भागात जाऊन करणार आहेत. या कामासोबत त्यांच्यावर सोपवलेले बुलडाणा लोकसभेचे नियोजन सुद्धा ते करणार आहेत. त्यामुळे सध्या शिंदेगटात असलेले खा. जाधव यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.