खासदार जाधवांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र खेडेकरांचा पदाने अभिषेक! जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

 
khede
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेच्या तिकिटावर तीनदा आमदार आणि तीनदा खासदार अशी महत्वाची पदे उपभोगल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधवांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने दमदार नेत्याला आता मैदानात उतरवले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि याआधी शिवसेनेच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नरेंद्र खेडेकरांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटात जाण्यापूर्वी प्रतापराव जाधवांकडे ही जबाबदारी होती. सध्या प्रतापराव जाधव हे शिंदेगटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. त्यामुळे नरेंद्र खेडेकर आता खासदार जाधवांसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि जिल्ह्यातील दोन आमदार अन् एक खासदार शिंदेगटात गेल्यानंतर नरेंद्र खेडेकरांनी उघडपणे त्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. चिखली, बुलडाणा, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा इथे झालेल्या मेळाव्यातील नरेंद्र खेडेकरांची भाषणे चांगलीच गाजली. "राहिली ती निष्ठा अन गेली ती विष्ठा" असे म्हणत खेडेकर जिल्ह्यातील शिवसैनिकांत  शिंदे गटात गेलेल्या नेत्यांप्रती असंतोष निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी ठरले.

त्यामुळे दोन आमदार, एक माजी आमदार आणि खासदार गेल्यानंतरही जिल्ह्यातील शिवसैनिक  उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. त्यातच आता नरेंद्र खेडेकरांना थेट उद्धव ठाकरेंकडून बळ मिळाल्याने खासदार जाधव यांना टक्कर देण्यासाठी कट्टर आणि आक्रमक नेता सज्ज झाला आहे. त्यामुळे खासदार जाधवांसमोर नरेंद्र खेडेकरांचे तगडे आव्हान आता उभे ठाकले आहे.