लवकरच ३ कोटीच्या निधीतून संत चोखामेळा जन्मस्थळाचा कायापालट! आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ग्वाही!

 
it7
बुलडाणा: महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांची परंपरा व वारसा लोक जपत- जोपासत आले. त्यापैकी सिंदखेड राजा मतदार संघातील ऐतिहासिक वारसा असलेल्या मेहुणाराजा हे गाव संत  चोखामेळा यांचे जन्मस्थळ उपेक्षित आहे. मात्र मी यासाठी प्रयत्न करत असून, जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त ३ कोटीच्या निधीतून या जन्मस्थळाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

संत चोखामेळा यांच्या ७५५ व्या  जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी  ते बोलत होते. मेहुणाराजा येथे दरवर्षी प्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने १४ जानेवारी रोजी संत चोखमेळा यांचा मोठ्या उत्साहात   जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी विनोद गायकवाड, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे,दे. राजा गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख,गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. महाआरती व पालखी मिरवणूक गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. पालखी सोहळा जन्मस्थळी पोहोचताच आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संत चोखोबाची  पालखी खांद्यावर घेऊन  मंदिराला प्रदक्षिणा घातली. 

   पुढे बोलतांना आमदार शिंगणे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात संत चोखामेळा  जन्म स्थळांचा विकास करण्यासाठी माजी सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे  यांच्या कार्यालयामार्फत संत चोखामेळा जन्मस्थळ विकास व सुशोभीकरण समाज मंदिर यासह विविध विकास कामासाठी १२ मार्च २०२० मध्ये ४ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. यापैकी ३ रुपयांचा निधी खर्च करण्यास २०२१-२२ या आर्थिक वर्षात मान्यता देण्यात आली आहे. सदर निधी जिल्हास्तरावर आलेला असून लवकरच जन्मस्थळाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास शिंगणे यांनी व्यक्त केला.

यावेळी  संत चोखामेळा अभ्यासक कमलेश खिल्लारे यांनी संत चोखामेळा यांचे विचार मांडले. शिवसेना तालुका अध्यक्ष दादाराव खार्डे, राष्ट्रवादी नेते गणेश सवडे,गजानन पवार, राजू शिरसाठ, राष्ट्रवादीचे युवा नेते समाधान शिंगणे, रामा म्हस्के अशोक, पाबळे, बबन कुमठे, व्ही. एस.जाधव, केवट सर,म्हस्के सर यांच्यासह सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व सक्तीचे भक्त मुख्याध्यापक शिक्षक वृंद, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.