सावजी वाट पाहून पाहून थकले! विठ्ठलाच्या डोक्यावर हात ठेवायला खासदार प्रतापराव जाधव पोहचलेच नाहीत!; शिरखुरमा खातांना खासदारांनी सांगितली होती "अंदर की बात"!

 
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खासदार प्रतापराव जाधव यांनी डोणगावातील एका घरी शिरखुरमा खातांना केलेल्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डोणगाव येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी ४ लाख रुपये घेऊन एक माणूस दिला त्यामुळे शिवसेनेचा सरपंच झाला अशा आशयाचे विधान खासदार जाधव यांनी  केले होते. दरम्यान कुण्यातरी कार्यकर्त्याने गुपचूप व्हिडिओ काढून व्हायरल केल्यानंतर एकच खळबळ उडाली. काँग्रेसनेते शैलेश सावजी यांनी खासदार प्रतापराव जाधव खोटे बोलत असल्याचा आरोप केला  आणि त्यांना पत्र लिहून डोणगावच्या विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाच्या डोक्यावर हात ठेवून "ते" विधान करून दाखवा असे आव्हान सावजी यांनी दिले. ठरल्याप्रमाणे आज, १२ मे रोजी सकाळी पावणेअकरा वाजता सावजी विठ्ठलाच्या मंदिरात पोहचले. त्यांनी खासदार जाधवांची वाट पाहिले मात्र साडेबारा वाजेपर्यंत खासदार जाधव मंदिरात पोहचले नव्हते.

   उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी ११ वाजता डोणगावच्या  विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाच्या डोक्यावर हात ठेवून मी ४ लाख रुपये घेतल्याचे सांगा असे आवाहन सावजी यांनी काल दिले होते. त्यामुळे आज सकाळी पावणेअकरा वाजता ते विठ्ठल मंदिरात पोहोचले. तिथेच ठिय्या मांडून त्यांनी खासदार प्रतापराव जाधवांची वाट पाहिली मात्र खासदार प्रतापराव जाधव काही पोहचले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा एकदा सावजी यांनी खासदार खोटारडे असल्याचा आरोप केला..