हे इकडचे संपर्कप्रमुख तर ते तिकडचे..! आ.गायकवाड आणि नरेंद्र खेडेकर यांच्यात संघटना वाढीवरून पेटणार युद्ध! निष्ठा कुणाची भारी? वाचकहो, ठरवा तुम्हीच..!

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड आता जिल्ह्याचे नेते झालेत ..हो, काल बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता संघटनेतील त्यांचे वजन निश्चितच वाढले आहे. याआधी खा. प्रतापराव जाधव जिल्हा संपर्क प्रमुख होते, यावरून शिवसेनेतील "त्या" पदाचे महत्व लक्षात येईल. खा. जाधवांना आता नेतेपदी बढती मिळाल्याने त्यांची जिल्ह्यातील जागा आता आमदार गायकवाडांना मिळाली आहे. तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी नरेंद्र खेडेकरांवर आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात जिल्हास्तरावर आ. गायकवाड आणि खेडेकर यांच्यात चांगलीच टक्कर होण्याची चिन्हे आहेत.

मुळ शिवसेनेत बंड (आ. गायकवाडांच्या भाषेत उठाव) करण्यात जिल्ह्यातून आमदार गायकवाड अग्रेसर होते. खा. जाधवांच्या आधी ते शिंदे गटात सामील झाले. महाविकास आघाडीत असताना भाजपच्या नेत्यांवर आणि आता भाजपा सोबत असताना ठाकरे  सेना आणि काँग्रेस , राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहाल भाषेत टिका करणारे म्हणून त्यांना राज्यभरात ओळख मिळाली. जिल्ह्यातही आ. गायकवाडांचा मोठा चाहता वर्ग आहे. याचाच फायदा संघटनेला व्हावा असा हेतू त्यांची नियुक्ती संपर्क प्रमुख म्हणून करण्यामागे असावा.जिल्ह्यात ठाकरेंच्या सेनेकडून   बाळासाहेबांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर सातत्याने गद्दारीचे आरोप होत असतात. या आरोपांना कोणत्या भाषेत उत्तर द्यायचे याचा आमदार गायकवाडांचा अभ्यास तगडा आहे. त्यामुळे आ. गायकवाडांच्या आक्रमक स्वभावाचा फायदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला होऊ शकतो. 
    
 खा.प्रतापराव जाधव हेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून आतापर्यंत कधी नव्हे एवढे माध्यमांत चर्चेचे असतात. नेते पद मिळाल्यानंतर त्यांनी केलेली अनेक विधाने राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. ठाकरे गटाच्या नेत्यांवर त्यांनीही अत्यंत जहाल शब्दात टीका केली,मात्र हे करीत असताना त्यांचावर शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांचा साधा उल्लेख त्यांनी कधी केला नाही. अनुल्लेखाने मारणे म्हणजे काय असते हेच खा.जाधवांनी दाखवून दिले. हे करीत  असताना जिल्ह्यातल्या नेत्यांचा समाचार घ्यायची जबाबदारी त्यांनी आ. गायकवाड यांच्यावर दिल्याचे दिसले.
    
आ.गायकवाड विरुद्ध खेडेकर..!!

नरेंद्र खेडेकर स्वतःला लोकसभेचे उमेदवार समजत असले तरी खा.जाधव त्यांना स्पर्धक मानायला तयार नाही. त्यामुळे संपर्क प्रमुख या नात्याने संघटना वाढीची लढाई आता गायकवाड आणि खेडेकर यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. संपर्क प्रमुख या नात्याने आ. गायकवाडांना आता जिल्हाभर फिरता येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेतील पदाधिकाऱ्यांना सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणण्यासाठी आ.गायकवाड धडपड करू शकतात. आ. गायकवाड यांच्याप्रमाणेच नरेंद्र खेडेकर हेसुद्धा आक्रमक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत, त्यामुळे दोघांच्यात शाब्दिक चकमकी उडण्याची शक्यता आहे.

    खरे निष्ठावान कोण ? तुम्हीच ठरवा...!

दरम्यान  दोन्ही शिवसेनेत आरोप- प्रत्यारोप सध्या केवळ "निष्ठा" या शब्दावरूनच होत असतात. आम्हीच कसे खरे निष्ठावान हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असतो. आ. गायकवाड आणि नरेंद्र खेडेकर दोघेही स्वतःला कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणवून घेत असले तरी दोघांना दुसऱ्या पक्षांचा सुद्धा अनुभव आहे. नरेंद्र खेडेकर जवळपास दोन दशके काँगेस मध्ये राहून शिवसेनेत परतले आहेत, काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी उपभोगले आहे. दुसरीकडे आमदार गायकवाड चौथ्या प्रयत्नात आमदार झाले आहेत. याआधी दोनदा अपक्ष आणि एकदा मनसेच्या तिकिटावर त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे खरे निष्ठावान आमदार गायकवाड की नरेंद्र खेडेकर हे तुम्हीच ठरवा..!