दुधावरची तहान ताकावर! केंद्रातल्या मंत्रीपदाचे काही खरे नाही आता खा. जाधवांना मिळाले मानाचे पद!

 
jadhav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांना सगळ काही मिळूनही ते शिंदेगटात सामील झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केल्या जातो. तीनदा आमदार आणि तीनदा खासदार राहिलेल्या व मोठा जनाधार पाठीशी असल्याचा दावा करणाऱ्या खा. जाधवांना शिंदेगटात गेल्यानंतर केंद्रात मंत्रीपद मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती मात्र अजून केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही आणि उरलेल्या १८ महिन्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विस्तार करण्याची शक्यता दिसत नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा.प्रतापराव जाधव यांची शिवेसेना नेतेपदी नियुक्ती केली आहे. खा. जाधव यांच्यासह ५ जणांना हा मान देण्यात आला असून भावना गवळी, गुलाबराव पाटील यांचाही यात समावेश आहे. 

जिल्ह्यातले दोन आमदार शिंदेगटात गेल्यानंतर आधी. खा जाधवांची तळ्यात मळ्यात अशीच भूमिका होती. बुलडाणा शहरातील  गर्दे हॉलमध्ये झालेल्या ठाकरे समर्थकांच्या मेळाव्याला फोनवरून का होईना पण त्यांनी संबोधित केले होते. मात्र "हवा का रुख" बदलत असल्याचे पाहून त्यांनीही शिंदेगटात जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात धोक्यात आलेली २०२४ ची लोकसभेची जागा वाचवणे हा त्यामागचा छुपा उद्देश असला तरी ते मात्र हिंदुत्वाचे कारण देत शिंदेगटात गेल्याचे सांगत होते.

त्यानंतर खा. जाधव यांची शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रात मंत्री पद मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती मात्र अजून केंद्रातल्या मंत्रिपदाचे काही खरे दिसत नाही. त्यामुळे आता दुधावरची तहान ताकावर भागवावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यासाठीच शिवसेना नेतेपदाचा मान देऊन खा. जाधव यांना खुश करण्याचा प्रयत्न शिंदेगटाने केल्याचे बोलल्या जात आहे.