‘कॉर्नर मिटिंग’ सांगून ‘श्रध्दांजली सभा’ झाल्याने घोळ झाल्याची शक्यता! ते ‘फटाके’ नव्हतेच,होती आतषबाजी स्काय शॉटची..! वाचा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांचे खास निरीक्षण..!
‘भारत जोडो’ यात्रेतील शेगावची सभा अभूतपूर्व, त्यात लक्षवेधी ठरली ती ‘स्काय शॉट’ची आतषबाजी. त्यामुळे अगदी भाषणासाठी पुढे आलेले खा.राहुल गांधी मागे वळून आकाशाकडे पाहत होते. अर्थात हे नियोजन बाळासाहेब थोरात यांचे होते. त्यांनी तशी अधिकृत परवानगी घेवून फटाके फोडण्यासाठीची आवश्यक ती खबरदारी तिथे घेतली गेली होती. जवळच अग्नीशमन दल तैनात होते, पोलिस यंत्रणेलाही त्याची कल्पना होती. परंतू भास्तनला असे अधिकृत काहीच नव्हते, शेगावच्या सभेचा यशस्वी प्रयोग करण्याचा तो प्रयत्न अंगलट आला!
अर्थात फटाके फोडण्याचे खापर आता विरोधकांवर फोडल्या जात आहे. विरोधक साधे फटाके फोडून मोकळे झाले असते, जर त्यांना गोंधळ करायचा असतातर. पण हे एकदा काडी लावल्यावर फुटणारे ४८ स्काय शॉट होते. अर्थात राहुल गांधी भडकल्यावर ते विझविण्यासाठी प्रयत्न झाला, पण धडाधड उडणारे शॉट विझवणे सोपे नसते. पण फटाके मध्ये थांबल्याने विझविण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसले. मात्र विझवतांना काही अनर्थ घडला नाही, वा विझवण्याच्या प्रयत्नात एखाद्या शॉट सभास्थळाकडे वळला नाही.. हे त्यातल्या त्यात सुदैवच.
अर्थात सभास्थळानजीक शेतात फटाके फोडण्याचे नियोजन यंत्रणेला माहित नव्हते का? हा सुध्दा एक प्रश्नच. राहुल गांधींनी तर ७३३ शहीद शेतकऱ्यांचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असा इशाराच दिला, अन् ते अक्षरशः फणफणतच बाहेर पडले. स्टेजवरुन उतरतांना दिलीपकुमार सानंदांनी त्यांना हात जोडले, पण त्यांनी तिकडे पाहिलेही नाही. दरम्यान, सूत्रसंचलनातून हर्षवर्धन सपकाळ यांनी फटाके फोडणाऱ्यांना त्वेषाने सुनावून निच, हलकट, असे काही-काही बोलून चांगलाच समाचार घेत फटाके फोडणाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे, असे आवाहन केले. या एका प्रकारामुळे सुरळीत चाललेल्या यात्रेला थोडे गालबोट लागले!
खर काय..?
पण खरचं फटाके फोडणाऱ्याचा उद्देश या यात्रेला गोलबोट लावण्याचा होता का? हेही तपासायला हवे. ‘कॉर्नर मिटिंग’ ही ‘श्रध्दांजली सभा’ म्हणून रुपांतरीत करण्यात आली, तेही १९ नोव्हेंबर रोजी कृषी कायदे मागे घेण्याची वर्षपूर्ती असल्याने. याची आधीच व्यापक चर्चा झाली असलीतर कदाचीत ‘फटाके’ लागले अन् फुटले नसते. बरं त्यात झाले असे, सपकाळानंतर लगेच थेट राहुल गांधी बोलायला उठले.. त्यामुळे ही ‘श्रध्दांजली सभा’ असल्याच्या मेसेज काडी लावणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकला नसेल, तर त्याने राहुल गांधी माईकपुढे आले म्हटल्यावर फटाक्याला काडी लावून दिली..
अन् भडकली मोठीच आग!