पदवीधरांपर्यंत पोहचण्यात उमेदवार पडतायत कमी! उमेदवारांचा केवळ बॅनरबाजीवर भर! बुलडाण्यातल्या १०० पैकी ६९ पदवीधरांना विद्यमान आमदारांचे नाव माहीत नाही; निवडणूकीला कोण उभे आहेत हेही माहीत नाही!
रणजित पाटलांबद्दल असलेल्या नाराजीचा फायदा कुणाला?

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी यावेळीही भाजपने रणजित पाटलांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसला सुटल्याने काँगसने मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र, उच्चविद्याविभूषित धीरज लिगांडे यांना उमेदवारी दिली आहे तर वंचित बहुजन आघाडीने प्रा.अनिल अंमलकार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान आता प्रचाराला सुरुवात झाली असली तरी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह सर्वच उमेदवार पदवीधर मतदारांपर्यंत पोहचण्यात कमी पडत आहेत. प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा भर बॅनरबाजी करण्यावर अधिक असल्याचे दिसत आहे. मतदारांशी थेट संपर्क करण्यात मात्र उमेदवारांची यंत्रणा कमी पडत असल्याचे "बुलडाणा लाइव्ह" च्या पाहणीत समोर आले. बुलडाणा शहरातील महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका याठिकाणी असलेल्या १०० पदवीधर मतदारांशी बुलडाणा लाइव्ह ने संवाद साधला. यावेळी तब्बल ६९ जणांना विद्यमान आमदार रणजित पाटील आहेत हेच माहित नव्हते. याशिवाय तेवढ्याच संख्येतील पदवीधरांना या निवडणुकीत कोण कोण उमेदवार रिंगणात आहेत हेसुद्धा सांगता आले नाही. ज्यावेळी पदवीधरांना रणजित पाटील आमदार असल्याचे सांगितले तेव्हा, ते आमच्या प्रश्नांवर बोलले असते तर त्यांचे नाव आम्हाला सांगता आले असते असे उत्तर काहींनी दिले.
ज्यांना नाव माहीत त्यांचीही नाराजी...
गत १२ वर्षांपासून अकोल्याचे रणजित पाटील अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची आमदारकी उपभोगत आहेत. तब्बल ३० वर्षे या मतदारसंघावर एकहाती अधिराज्य गाजवणाऱ्या बी. टी.देशमुख यांच्यासारख्या मात्तबराचा पराभव करून रणजित पाटील १२ वर्षांपूर्वी भाजपकडून आमदार झाले होते. त्यावेळी पदवीधरांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रणजित पाटलांना गृह आणि नगरविकास सारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री पदही मिळाले होते. अकोला आणि वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील फडणवीसांनी रणजित पाटलांवर सोपवली होती. मात्र एवढे मिळूनही पदवीधरांसाठी रणजित पाटलांनी काय केले? असा प्रश्न आता पदवीधर मतदार उपस्थित करतांना दिसले. पदवीधरांच्या प्रश्नांपेक्षा रणजित पाटलांना अकोला जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणातच जास्त इंटरेस्ट असल्याचा आरोपही आता त्यांच्यावर होऊ लागला आहे. ज्या ३१ पदवीधरांना रणजित पाटलांचे नाव माहीत होते, त्यातील बहुतांश पदवीधरांनी देखील रणजित पाटलांच्या कार्यपद्धतीवर बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना नाराजी व्यक्त केली.
धीरज लिंगाडेंना फायदा..?
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात बुलडाणा जिल्ह्यात ३७ हजारापेक्षा अधिक मतदार आहेत. दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने जेव्हा पदवीधरांना धीरज लिंगाडे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची कल्पना दिली, तेव्हा आता लिंगाडे यांच्याकडून आम्हाला अपेक्षा असल्याचे बुलडाण्यातील पदवीधर बोलतांना दिसले. त्यामुळे रणजित पाटलांबद्दल पदवीधरांमध्ये असलेल्या नाराजीच्या फायदा धीरज लिंगाडे यांना होण्याचीच शक्यता असल्याचे दिसत आहे..अर्थात प्रचारतंत्र नीट राबविले तरच...!