जिल्ह्यातील आगामी निवडणुका युतीने लढवणार! भाजपा - शिंदेसेनेच्या शेगावच्या बैठकीत खासदार अन् जिल्ह्यातील आमदारांचा निर्धार! कार्यकर्ते म्हणतात तुम्ही एकत्र याल हो पण....

 
hkjkjh
शेगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपा - शिवसेना युतीला जनादेश दिला. मात्र या जनादेशाचा अपमान करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस , राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली व बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यामुळे जनादेशाचा सन्मान करण्यासाठी भाजपा आणि शिवसेना(शिंदे गट) आता पुढील सर्वच निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा निर्धार भाजपा आणि शिंदेसेनेच्या शेगावला झालेल्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला जिल्ह्याचे खासदार व जिल्ह्यातील भाजपा व शिंदेसेनेचे सर्वच आमदार उपस्थित होते. खासदार - आमदारांनी केलेल्या या निर्धारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करणारे कार्यकर्ते मात्र चांगलेच कन्फ्युज झाले आहेत. युती झाल्यावर आपल्याला संधी मिळेल का असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलाय.

शेगाव येथे काल पार पडलेल्या बैठीकात खा. जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले,आ.संजय कुटे, आ.संजय रायमुलकर , आ. संजय गायकवाड यांच्यासह भाजप व शिंदेसेनेचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणूक युतीने लढण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला. भाजपा आणि सेनेचे सध्याचे सरकार लोकहिताचे, शेतकऱ्यांचा हिताचे निर्णय घेत असल्याचे आ. कुटे म्हणाले. सरकारचे निर्णय लोकापर्यंत पोहचविण्याच्या रणनितीवर सुद्धा बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांचा शिवसेना संपविण्याचा डाव होता. नरेंद्र मोदी सरकारने हिंदुत्वाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांवर आम्हाला आनंद व्यक्त करता येत नव्हता कारण आम्ही तेव्हा भाजपसोबत नव्हतो असे खा. जाधव म्हणाले.
 
तुम्ही एकत्र याला हो,पण कार्यकर्त्यांचे काय..!

दरम्यान राज्यातील सत्तापालट होण्यापूर्वी भाजपने स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी केली होती. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. अनेक वर्षांपासून पक्षाची एकनिष्टतेने सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देता आली असती  . मात्र आता युतीमुळे जागावाटपाच्या भानगडीत पुन्हा अनेक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता असल्याने नेत्यांच्या एकत्रित लढण्याच्या निर्धाराने कार्यकर्ते मात्र कन्फ्युज झाल्याचे चित्र आहे.