खासदारांच्या उठावाला ' प्रतापगड' चे पाठबळ! मेहकरात जंगी स्वागत; बैठकीत पदाधिकाऱ्यांची शतप्रतिशत हजेरी!!

 
YUY
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेविरुद्ध केलेल्या बंडाला नव्हे उठावाला मेहकर मतदारसंघातील पदाधिकारी व दुसऱ्या- तिसऱ्या फळीतील नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे आज दिसून आले. अपवाद वगळता बहुतेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताला व मेळाव्याला हजेरी लावल्याने मतदार संघातील शिवसेना आता शिंदेंसेना झाल्याचे चित्र आज सारंगधर नगरीत दिसून आले. 

राष्ट्रपती निवडणुकीच्या  मुहूर्तावर दिल्ली मुक्कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यावर खा जाधव यांचे आज 23 जुलैला मेहकर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. वर्षानुवर्षे खा. प्रतापराव जाधव यांची साथ देणाऱ्या मेहकर व लोणार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उठावानंतर देखील आपली साथ, पाठबळ कायम असल्याचे भगव्या जंगी शक्तिप्रदर्शन द्वारे दाखवून दिले. वेदिका लॉन मध्ये आयोजित बैठक एकप्रकारे  पाठबळ मेळावाच ठरला!  हिम्मतराव सानप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात मतदारसंघच नव्हे जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावीत ' हम भी तुम्हारे साथ है' हे दाखवून दिले. प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर, संचलन जयचंद बाठिया तर आभार समाधान साबळे यांनी मानले.
 
भाजपा सोबत गेलो म्हणजे सेना सोडली असे नव्हे..

 या बैठकीत खासदार काय बोलतात, काही वेगळे बोलतात काय आणि  जहाल टीका करतात काय ? हा उत्सुकतेचा विषय होता . मात्र तसे काही न करता खा.जाधव यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस, मातोश्री वरील कथित चांडाळ चौकडी, निधी वाटपातील अन्याय यावरच आपल्या भाषणाचा रोख ठेवला. भाजपा सोबतची युती ही नैसर्गिक असल्याचे सांगून त्यांच्या समवेत गेलो म्हणजे सेना सोडली असा अर्थ  होत नाही. राष्ट्रवादी चे धूर्त नेते यांनी टाकलेल्या डावपेचात सेना अडकत गेली. उद्धव साहेबांना सीएम करीत राष्ट्रवादीने महत्वाची खाती, निधी लाटला. आमच्या इच्छे विरुद्ध पालकमंत्री लादले, निधीत अडसर तयार केले. यावर बोलायचा प्रयत्न केला तर चांडाळ चौकडीने ते होऊ दिले नाही. राज्यसभेच्या लढतीत संभाजी राजे आमच्या मनातील उमेदवार होते, ते होऊ दिले नाही. आमच्या उठावाची ही कारणे आहेत असे खासदार म्हणाले.