"त्या" ७ अनाथ बालकांचा सरकार करेल सांभाळ ! आ.संजय गायकवाड यांनी रेटला विधानसभेत प्रश्न;महिला व बालविकास मंत्र्यांनी दिला शब्द

 
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोरोना काळातील ज्यांचे आई-वडील मृत झाले आहेत अशा बालकांना शासनाने मदत केली.परंतु बुलडाणा जिल्ह्यामध्ये अशी ७  बालके आहेत की, त्या मुलांना कोरोना काळामध्ये रस्त्यावर फेकून दिल्या गेले तर काही बालके अन्य ठिकाणी आढळून आली. या ७ बालकांचे भविष्य काय? असा प्रश्न आम. संजय गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केल्याने, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २ महिन्याच्या आत त्या ७ मुलांची व्यवस्था करण्याचे आश्वासित केले आहे.

 पळसखेड सपकाळ येथील वैष्णवी गीता आश्रम येथे वास्तव्यास असलेल्या  ७ अनाथ बालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी आ.संजय गायकवाड यांनी विधानसभेमध्ये पुढाकार घेतला. कोरोना काळात ज्यांचे आई-वडील मृत पावलेले आहेत अशा अनाथ बालकांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गायकवाड म्हणाले की,महाराष्ट्र शासनातर्फे कोरोनामध्ये ज्यांचे आई-वडील मृत झाले आहेत अशा बालकांना मदत झालेली आहे परंतु बुलडाणा जिल्ह्यामध्ये अशी ७  बालके आहेत की, त्या मुलांना कोरोना काळामध्ये रस्त्यावर फेकून दिल्या गेले होते, त्यातील एक मुलगा उकिरड्यावर सापडलेला आहे, एक मुलगा बस स्टॅन्ड वर सापडलेला आहे, आणि बाकीची मुले सुद्धा अशीच वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेली आहेत.

ही सर्व मुले एक वर्षाच्या आतील असल्यामुळे त्यांना आपले आई-वडील कोण आहे हे सुद्धा सांगता येत नाही. यासाठी शासन काय उपयोजना करणार आहे? यांचे संगोपन आणि पालन-पोषण कशाप्रकारे केले जाणार? असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. दरम्यान महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी आश्वासित केले. सदर मुलांची सर्व माहिती ही लवकरात लवकर घेऊन २ महिन्याच्या आत त्या ७ मुलांची शासनाच्या नियमाप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.