राजकीय पुढाऱ्यांच्या दाव्याने निवडून आलेले सरपंचच झाले कन्फ्युज! "या" कारणामुळे अनेक सरपंचांनी लावली सर्वपक्षीय नेत्यांच्या कार्यालयात हजेरी! नेता म्हणे, "अय जा,
अन् त्याला आपल्या कार्यालयावर घेऊन ये"..!!
दरम्यान या सगळ्या घोळात निवडून आलेले उमेदवारच कन्फ्युज झाल्याचे दिसून आले. "आपण कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली नाही, प्रचारात पक्षाचे नावही घेतले नाही. गावातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्यासाठी प्रचार केला, मग आता निवडून आल्यावर पक्षाचा शिक्का कशासाठी?" असा सवालही काही सरपंचांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना उपस्थित केला.
दरम्यान काही सरपंचांनी गावाचा विकास हेच आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी सगळ्यांचं पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असणे गरजेचे आहे,त्यामुळे निवडून आल्यानंतर सगळ्यांचं नेत्यांच्या कार्यालयात हजेरी लावून भेटी घेतल्याचे काही सरपंचांनी सांगितले. तर काहीं गावच्या सरपंचांवर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी दावा केल्याने निवडून आलेले उमेदवारही कन्फ्युज झाल्याचे दिसले.
अय, त्याला आपल्या कार्यालयावर घेऊन ये...!
दरम्यान काही नेत्यांनी तर निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेण्याची फिल्डींग लावल्याचे मजेशीर चित्र दिसून आले. अमक्याचा विजय झाल्यानंतर तो आपल्या कार्यालयात आलाच पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली होती..त्यामुळे नेत्यांच्या कार्यालयात क्षणाक्षणाला "अय,जा अन् त्याला आपल्या कार्यालयात घेऊन ये.." असा नेत्यांचा आवाज घुमत होता..!