"या रस्त्याच्या अधिकाऱ्याचा मुर्दा पडो"! माजी मंत्री सुबोध सावजी यांची गांधीगिरी! वाचा काय आहे प्रकरण..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्ते ह्या विकासाच्या धमनी असतात मात्र याच रस्त्यांची दुरावस्था बघता ' या रस्त्यांच्या अधिकाऱ्यांचा मुद्दा पडो,' असे रस्त्यावर अधोरेखित करीत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गांधीगिरीने निषेध नोंदविला आहे.

लोकप्रतिनिधींचा वचक नसेल तर प्रशासकीय यंत्रणा निर्ढावते, कोणाचाच कोणाला पायपोस नसतो.सध्या अशीच अवस्था मेहकर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मेहकर ते डोणगांव पर्यंत या महामार्गावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांकडे संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. या रस्त्यांच्या महामार्गावर खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.त्यामुळे हा महामार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दैनंदिन अवस्था निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत.त्यामुळे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गांधीगिरी करत महामार्गाच्या अनेक ठिकाणी " या रस्त्याच्या अधिकाऱ्याचा मुर्दा पडो',असे वाक्य लिहून निषेध नोंदवला आहे.

हल्ली मरण इतके स्वस्त झालेय की, कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडलो,तर पुन्हा  सुखरुपपणे घरी परतू की नाही? याची शाश्वती राहिलेली नाही. कारण या स्वस्त झालेल्या मरणाला रस्त्यावरील छोटे मोठे खड्डेच जागोजागी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत.बहुतांश ठिकाणी खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी घेतले आहेत. कित्येकांच्या आयुष्यात अंधकार पसरवला आहे.अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.रस्त्यावरील खड्ड्यांच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच अनुषंगाने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी गांधीगिरीचा अवलंब करून राष्ट्रीय महामार्गावर ठिक ठिकाणी 'या रस्त्याच्या अधिकाऱ्याचा मुर्दा पडो',असे वाक्य लिहून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च रस्त्याची कामे करण्यात येतात मात्र संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची हितसंबंध गुंतलेले असल्याने मेहकर तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर ते नागपुर राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस वर्दळ असते.याच महामार्गावरील डोणगांव ते मेहकर जवळपास 350 खड्डे 19 किलोमीटरवर आढळून येतात.यात 100 खड्डे जिवघेणे आहेत.या राष्ट्रीय महामार्गावरुन सर्वच लोकप्रतिनिधी ये-जा करत आहेत.मात्र त्या संबंधित प्रशासकीय यंत्रणेला खड्डे बुजविण्याच्या सुचना केल्या की नाही? मला माहिती नाही. पण या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.अनेकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.त्यामुळे मी 'या रस्त्याच्या मधोमध 'या रस्त्याच्या अधिकाऱ्याचा मुर्दा पडो ', असं वाक्य लिहून संबंधित प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवला आहे.
   - सुबोध सावजी
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अकोला, बुलडाणा