बुलडाण्यातल्या शिवसैनिकांची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! शिवसैनिकांनी पालकमंत्री डॉ.शिंगणे विरुद्ध केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांचे प्रत्युत्तर!
आ. संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आधीपासून सहभागी झाले आहेत. आज दुपारी त्यांनी कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर शिवसैनिकांनी जयस्थंभ चौकात एकत्र येत आ. गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. व आघाडी तोडा अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना शहरप्रमुखांनी राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप केला. पालकमंत्री डॉ.शिंगणे निधी देण्यात दूजाभाव करतात असेही ते म्हणाले.
या आरोपांना दत्तात्रय लहाने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यांनाच शिवसेनेत राहायचे नाही त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. सर्वात जास्त निधी हा बुलडाणा विधानसभा मतदार संघालाच मिळाला आहे. मात्र तिकडे जायचे असल्याने पालकमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करायचे असा हा खटाटोप आहे . हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी शिवसैनिकांची अवस्था झाल्याचे दत्तात्रय लहाने म्हणाले. आ. संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी असेही ते म्हणाले.