टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली बुलडाणा नगरी! वारकरी भवनाचे थाटात भूमिपूजन; शंकराचार्य रामदेवानंद सरस्वतींनी दिला आ.संजय गायकवाड यांना लवकरच मंत्री बनण्याचा आशिर्वाद;

हरीचैत्यन्य स्वामी म्हणाले,आ. संजुभाऊ धर्मासाठी झटणारा माणूस

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या वारकरी भवनाचे आज, मोठ्या थाटात भूमिपूजन संपन्न झाले. शंकराचार्य स्वामी रामदेवानंद सरस्वती व साधू संताच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या बुलडाणा शहरात दाखल झाल्या होत्या. भूमिपूजन सोहळ्यानंतर धाड नाक्यावरील ओंकार लॉन मध्ये साधू संतांचा आशीर्वचन सोहळा पार पडला. या सोहळ्यात शंकराचार्य स्वामी रामदेवानंद सरस्वती  यांनी आमदार संजय गायकवाड यांना आशीर्वाद दिले. 

आमदार संजय गायकवाड हे लवकरच मंत्री बनतील असे यावेळी स्वामी रामदेवानंद सरस्वती म्हणाले. आज आनंदाचा दिवस आहे. संजय गायकवाड हे हिंदुत्वासाठी समर्पित आहेत, धर्मासाठी कटिबद्ध आहेत असे स्वामी रामदेवानंद सरस्वती म्हणाले. सनातन संस्कृतीच्या, धर्माच्या रक्षणासाठी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय सनातन संस्कृतीसाठी पोषक आहे.

इथे होणारे वारकरी भवन वारकऱ्यांच्या सुविधेसाठी असणार आहे. एकाच वर्षात या भवनाचे बांधकाम पूर्ण होईल, कारण आमदार गायकवाड परिश्रमी आहेत असेही ते म्हणाले. वारकरी भवनामुळे भक्तांसाठी ,साधकांसाठी ,साधना करणाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. आमदार संजय गायकवाड लवकरच मंत्री बनतील अशा आमच्या शुभेच्छा आहेत असेही यावेळी स्वामी रामदेवानंद सरस्वती म्हणाले. साधू ,संताचा वारकऱ्यांचा आशीर्वाद आ.गायकवाड यांच्यासोबत असल्याचेही ते  पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
    
आ.गायकवाड धर्मासाठी रात्रंदिवस झटणारा माणूस: स्वामी हरीचैतन्यजी महाराज

   आज, बुलडाणा जिल्ह्यासाठी मोठा गौरवाचा दिवस आहे. आ.गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून अडीच कोटी रुपयांचे बुसी दिव्य वारकरी भवन इथे उभे राहत आहे, याचे सर्व श्रेय संजुभाऊंचेच आहे असे गौरवोद्गार स्वामी हरीचैतन्यजी महाराज यांनी काढले. जिल्ह्यातील , महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी विविध संप्रदायातील संत महात्म्यांसाठी मोठी सुविधा बुलडाणा येथील वारकरी भवनात होणार आहे ही मोठी गौरवाची गोष्ट आहे. संजुभाऊ धर्मासाठी झटणारा माणूस आहे. हिंदू धर्मासाठी रांत्रदिवस त्यांचे रक्त जळत असते. त्यांच्याकडे केव्हाही धर्माचे काम घेऊन जा ते सदैव उभे असतात, त्यामुळे मी त्यांना आर्शिवाद देतो असे स्वामीजी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.