आमदार संजय गायकवाडांच्या होम ग्राउंड वर शुक्रवारी ठाकरे गटाचा मेळावा! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देणार आ. गायकवाडांना चॅलेंज?

 
rrrr
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी सोपवली असून या निमित्ताने बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.  १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी संयुक्तरीत्या केले आहे.

विशेष म्हणजे शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांच्या होमग्राउंड वर हा मेळावा होणार असल्याने जुना इतिहास पाहता तगडा बंदोबस्त पोलिसांना तैनात करावा लागणार आहे. याआधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठाकरे गटाच्या कार्यक्रमात आ. गायकवाड समर्थकांनी राडा केला होता. आता संपूर्ण जिल्हाभरातील ठाकरे गट समर्थक बुलडाणा शहरात येणार असल्याने या मेळाव्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत. विरोधी पक्षनेते दानवे हे सुध्दा आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध असल्याने ते आ. गायकवाड यांना उद्देशून काही बोलतात का? तसे झाले तर आ. गायकवाड यांची भूमिका काय असेल याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
 
  जिल्ह्यात अधिक जोमाने शिवसेना संघटन मजबूत करण्यासह येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना उभारी मिळावी या दृष्टिकोनातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा  हे मेळावा शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी गर्दे सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील,  भास्करराव मोरे   छगनराव मेहेत्रे,  महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सत्कार सोहळा व  मेळाव्यासाठी शिवसेना अंगीकृत  संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी  उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी केले आहे.