अखेर महाविकास आघाडीतून 'स्वाभिमानी' बाहेर! बुलडाण्यात रविकांत तुपकर स्वबळावर लढणार?

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत राहणार की बाहेर पडणार, अशी चर्चा सुरू होती. ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यावर निर्णय घेऊ, असे खुद्द राजू शेट्टी म्हणाले होते. त्यामुळे आज ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. अखेर कोल्हापुरातील राज्य कार्यकािरणीच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली अाहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाबरोबर जाणार, याबद्दल उत्‍सुकता असताना बुलडाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर आता स्वबळावर निवडणूक लढवणार का आणि लढतील तर ते कोणत्या मतदारसंघातून अशी चर्चा नव्याने सुरू झाली आहे.


काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी बुलडाण्यात आले तेव्हा आम्ही सर्वच पक्षांसोबत युती करून पोळून निघालो आहोत, असे विधान केले होते. त्यामुळे स्वाभिमानी आता यापुढील निवडणुका स्वबळावरच लढेल, असे अंदाज वर्तवले जात आहे. पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पार्टीने जसा सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला, तसा महाराष्ट्रातील जनतेला स्वाभिमानी शेतकरी संघटना पर्याय उपलब्ध करून देईल, असे विधान काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकर यांनी केले होते.

याशिवाय रविकांत तुपकर ठरवतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली होती. यापूर्वी युती आणि आघाडीत असताना जागा वाटपाच्या तिढ्यामुळे तुपकरांना तयारी करूनही निवडणुकीपासून वंचित रहावे लागले होते. आता महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने तुपकरांचे मैदानात उतरणे कन्फर्म झाल्याचे बोलले जात आहे.