सुंदरखेड ग्रामपंचायतीचे राजकारण पेटले; स्ट्रॉंगरूमवर सीसीटीव्ही कॅमेरे का लावले नाही? वंचितचा सवाल! फेर निवडणूक घेण्याची केली मागणी

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामपंचायत सावळा- सुंदरखेड-हनवतखेड सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत झालेल्या सदोष कार्यपद्धतीवर कठोर कारवाई करावी व फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सावळा- सुंदरखेड-हनवतखेड निवडणूक १८ डिसेंबरला घेण्यात आली.
निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या स्ट्रॉंग रूमला सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक होते. परंतु स्ट्रॉंगरूमला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेला स्ट्रॉंगरूम मधील ईव्हीएम मशीनला छेडछाड करण्यात आल्याचा संशय आहे.तसेच वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवाराला जनमतामध्ये स्पष्ट बहुमत असताना, उमेदवार निकालात पीछाडीवर दिसून आला. सदर बाब असंवैधानिक असून लोकशाहीला काळीमा फासणारी आहे,असा आरोप  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. 

 मतमोजणीच्या वेळी महसूल कर्मचाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधीला बाहेर काढून दिले, असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दरम्यान स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेरे का लावले नाहीत? मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना बाहेर का काढून देण्यात आले? मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर बूथ प्रतिनिधींना दिलेले आकडे हे मतमोजणीच्या दिवशी जाहीर झालेल्या आकड्यांसोबत का जुळत नाहीत? यामध्ये फरक येण्याचे कारण काय?  असा सवालही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

मतदान प्रक्रिया सुरू असताना व्हीव्हीपॅट मशीन ईव्हीएम मशीनला जोडणे गरजेचे आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन द्वारा जाहीर झालेले वोटिंग आणि व्हीव्हीपॅट मशीनने दिलेल्या पावत्या जुळून आल्या पाहिजेत. तसं न झाल्यास काही तरी गैर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशीन का जोडली नाही? याबाबत विचारणा करून कार्यवाही करावी. स्ट्रॉंगरूमकडे ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी नाही ते कर्मचारी देखील या परिसरात वावरत होते. याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी. दोषी यंत्रणेवर वरिष्ठअधिकाऱ्यांची निष्पक्ष समिती नेमून ३० दिवसाच्या आत अहवाल घ्यावा व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे तसेच सुंदरखेड ग्रामपंचायतची पुन्हा निवडणूक घ्यावी   अशा विविध मागण्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सतीश पवार, संजय राऊत, अर्जुन खरात, संतोष राजपूत, सागर गवई, एस.एस. सुरडकर, गणेश पन्हाळकर, ज्ञानेश्वर राजपूत, निलेश गायकवाड, गुलाबराव गवळी यांची स्वाक्षरी आहे.