काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज जिल्ह्यात; देऊळगावराजा व चिखलीत घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक ; भारत जोडो यात्रसाठी नेत्यांनी कंबर कसली..!

 
patole
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १७, १८ नोव्हेंबरला खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जिल्ह्यातून जाणार आहे. यादरम्यान शेगाव येथे एका जाहीर सभेला खा. राहुल गांधी संबोधित करणार आहेत. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून बैठकांना वेग आला आहे. आज, ४ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भारत जोडो यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात येत आहेत.

नाना पटोले हे सकाळी ११ वाजता देऊळगावराजा येथे देऊळगाव राजा व सिंदखेडराजा ब्लॉक कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ वाजता चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज येथे चिखली ,मेहकर व लोणार ब्लॉक कमिटीची बैठक होणार आहे. दरम्यान आज मेहकर व लोणार तालुक्याची बैठक मेहकरातील कृषी वैभव लॉन येथे होणार होती,मात्र त्याऐवजी ही बैठक आता चिखली येथे होणार आहे.

मेहकर व लोणार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी चिखली येथील बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन मेहकर तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी केले आहे. चिखली येथील बैठक आटोपल्यानंतर नाना पटोले पत्रकार परिषदेला संबोधित करतील त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता ते शेगावला निघतील. शेगाव येथेच त्यांना मुक्काम असून उद्या ते भारत जोडो पदयात्रेच्या मार्गाची व सभेच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत.