७ पालिकांच्या प्रभाग रचनांचा 'सोक्षमोक्ष' सोमवारी ! आयोग व आयुक्तांच्या मान्यतेची प्रतिक्षा
जिल्ह्यातील ७ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनावर घेण्यात आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या समक्ष २३ मे रोजी सुनावणी घेण्यात आली. रचनेवर हरकत घेणारे राजकीय कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी त्यांची तर पालिकांच्यावतीने मुख्याधिकारी व स्थापत्य अभियंता यांनी बाजू मांडली. चिखली वगळून अन्य ८ पालिकांच्या प्रभाग रचनावर मागील १० ते १४ मे दरम्यान नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या . बुलडाणा, मलकापूर मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ११ ( एकूण २२) हरकती प्राप्त झाल्या. मेहकर, देऊळगाव राजा व खामगाव मध्ये प्रत्येकी ४ मिळून १२, शेगाव मध्ये ५ तर जळगाव जामोद मध्ये केवळ एकच हरकत प्राप्त झाली. नांदुरा मध्ये एकही हरकत प्राप्त झाली नाहीये.
चेंडू आयुक्तांच्या कोर्टात!
दरम्यान जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी सुनावणी नंतर ४० हरकतींवर आपल्या अभिप्रायासह ८ पालिकांच्या प्रारूव रचनांचे प्रस्ताव सादर केले. जळगाव व देऊळगाव राजा या क वर्ग पालिकांचे प्रस्ताव विभागीय आयुक्त तर ब वर्ग पालिकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले. याला ते सरसकट मान्यता देतात काय याकडे आता लक्ष वेधले आहे. मान्यता मिळाली तर ही रचना प्रसिध्द करण्यात येईल. यानंतर नजीकच्या काळात मतदार यादी कार्यक्रम जाहीर होईल.