खोटारड्या आणि फसवेगिरी करणाऱ्या भाजपला जागा दाखवून द्या; धिरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आवाहन;
म्हणाले, जुनी पेन्शन योजना केवळ काँग्रेसच लागू करू शकते
उद्या ,३० जानेवारीला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे आवाहन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानतेचे धोरण बदलून केवळ २१ मित्रो साठी भाजपा सरकार काम करीत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. काँग्रेसच जुनी पेन्शन योजना लागू करू शकते हे काल परवा झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
आमचे नेते राहुल गांधी यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शब्द दिला आहे. ऐनवेळी अभ्यासक्रमाचा पॅटर्न बदलून एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक सरकारने केली आहे. शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुले प्रशासकीय सेवेत जाऊ नयेत अशी व्यवस्था भाजपकडून करण्यात येत आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान करण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे या अपमानाचा बदला घेण्याची संधी विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आहे. खोटारड्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करा असे आवाहन नाना पटोले यांनी केले.