काँग्रेसपाठाेपाठ शिवसेनेचाही स्वबळाचा नारा!; शिवसेना खासदार संजय जाधव म्हणाले, सध्या सोबत असलेले भविष्यात टिकण्याची शक्यता नाही!, काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न, "या' नेत्याला म्हणाले शिवसेनेत या!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी स्वबळाची भाषा करतात. बुलडाण्यात सुद्धा काँग्रेस नेत्यांनी लोकसभा लढवणार असल्याचे विधान केले होते. याबद्दल श्री. जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, की काँग्रेसला जे करायचे ते करू द्या. प्रत्येकाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आमचे सोयरपण आता काही तुटलेले आहे तर काही जोडलेले आहेत.
तुटलेले पुन्हा जुटतील याची गॅरंटी नाही आणि सध्या जे सोबत आहेत ते कायम सोबत राहतील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे ज्याला त्याला त्याच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना स्वबळावर लढू शकते. त्यामुळे गावपातळीवर शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणे, त्यांना पक्षात सक्रिय करणे, जबाबदार पदाधिकारी काम करतात की नाही, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतात की नाही हे जाणून घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान असल्याचे ते म्हणाले.
ॲड. विजय सावळेंना म्हणाले, शिवसेनेत या!
खासदार संजय जाधव यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. विजय सावळे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विजय सावळे यांची तोंडभरून स्तुती केली. अतिशय प्रतिभावान माणसाला आता मात्र त्यांच्याच पक्षात कुणी विचारत नाही. त्यामुळे तुम्ही आता शिवसेनेत या. सत्ता उपभोगून लोक बदलत आहेत. मग तुम्ही न उपभोगता बदलायला काय हरकत आहे, असे संजय जाधव म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.