शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली "बुलडाणा लाइव्ह " च्या बातमीची दखल! कोलारा गावच्या गजानन सोळंकी या शेतकऱ्याला मिळालेल्या पीक विम्याचा हिशोबच भर सभेत मांडला..!

 
bgcf
चिखली(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या व सर्वाधिक  साडेतीन ते पावणेचार लाख  वाचकसंख्या असलेल्या बुलडाणा लाइव्ह च्या बातमीची  दखल आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. कोलारा येथील शेतकरी गजानन सोळंकी यांना मिळालेल्या पीक विम्याच्या रकमेची बातमी बुलडाणा लाइव्ह ने काल, २५ नोव्हेंबरला प्रकाशित केली होती. खर्च वजा जाता शेतकऱ्याला हाती केवळ ३३ रुपये उरतात असे बुलडाणा लाइव्ह ने वृत्तात म्हटले होते. आज उद्धव ठाकरेंनी चिखलीच्या सभेत शेतकऱ्याच्या नावाचा गावासह उल्लेख करून पीक विम्याच्या रकमेचा हिशोब मांडला.

चिखली तालुक्यातील कोलारा येथील शेतकरी गजानन सोळंकी यांच्या खात्यात काल,२५ नोव्हेंबरला २४७६ रुपये जमा झाले होते. त्यानंतर त्यांनी "बुलडाणा लाइव्ह" ला फोन करून जमा झालेली रक्कम आणि पीक विमा काढण्यासाठी लागलेल्या खर्चाचा हिशोब बुलडाणा लाइव्ह ला सांगितला होता.  गजानन सोळंकी यांनी २१०९ रुपये पीक विमा भरला. १०० रुपये विमा काढणाऱ्याने घेतले. ३० रुपये सातबारा काढण्यासाठी लागले. २०० रुपये पंचनामा करणाऱ्याने घेतले. ४ रुपये झेरॉक्स काढण्यासाठी लागले . असा एकूण २४४३ रुपये खर्च झाला होता.

त्यामुळे सोळंकी यांना खर्च वजा जाता केवळ ३३ रुपये उरले. बुलडाणा लाइव्ह ने काल, २५ नोव्हेंबरला सकाळीच ते वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांनी बुलडाणा लाइव्ह ला त्यांना मिळालेल्या रकमेचे स्क्रीनशॉट व हिशोब पाठवला होता. दरम्यान आज, उद्धव ठाकरेंनी कोलारा येथील गजानन सोळंकी या शेतकऱ्याचे नाव घेत त्यांना मिळालेल्या रकमेचा व खर्चाचा हिशोबच सभेत मांडला.