मेहकरात शिवसेना खासदारांच्या स्वागताला जिल्हाप्रमुखच गैरहजर! चर्चांना उधाण..! बुलडाणा लाइव्हशी बोलतांना म्हणाले..
Updated: Jul 23, 2022, 20:13 IST
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिंदेगटात सामील झाल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांचे शिवसैनिकांकडून दमदार स्वागत करण्यात येतेय. काल सिंदखेडराजा येथे हजेरी लावल्यानंतर आज मेहकर आणि चिखलीत खासदार जाधवांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी यांनीच दांडी मारल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मेहकर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार जाधवांनी शिंदेगटात सामील होण्याच्या कारणांचा पाढा वाचला. आपण शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. हिंदुत्वासाठी भाजपसोबत नैसर्गिक युती केल्याचे खासदार जाधवांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र जिल्हाप्रमुख बळीराम मापारी दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू होती. दरम्यान बुलडाणा लाइव्हने बळीराम मापारी यांच्याशी संपर्क साधला असता आपण देवदर्शनासाठी तुळजापूर ला असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही ते म्हणाले.