"ती" ऑडियो क्लीप बनावट; तो आवाज माझा नाहीच! धिरज लिंगाडेंचे स्पष्टीकरण! मिळणारे समर्थन पाहून विरोधकांना पोटशूळ! पायाखालची वाळू सरकल्याने खोटी ऑडियो क्लिप व्हायरल केली

 
बुलडाणा: (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्याला पदवीधर व पदवीधरांच्या विविध संघटनांचे मोठे समर्थन मिळत आहे.  प्रचारासाठी होणाऱ्या सभांना पाचही जिल्ह्यात पदवीधरांनी मोठी उपस्थिती दर्शविली, आता या निवडणुकीचा निकाल ही औपचारिकता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सभागृहात पाठविण्याचा निर्धार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील पदवीधरांनी केला आहे. आपल्याला  मिळणारे समर्थन पाहून विरोधक बैचेन आहेत, त्यांच्या झोपा उडाल्या आहेत. विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता खोटे ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप खोटी असून "तो" आवाजच आपला नसल्याचे धिरज लिंगाडे यांनी स्पष्ट केले आहे.

काही वर्षाआधी विद्यमान आमदारांचा कार्यकर्ता असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने व्हायरल केलेली ऑडियो क्लिप पूर्णपणे खोटी आहे. तो आपला आवाजच नाही, याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशी आपले बोलणे झाले असून ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे त्यांनाही सांगितले आहे.
 पदवीधर मतदार सुजाण आहे. पदवीधरांच्या प्रश्नांवर काँग्रेस आणि महाविकास आघाडी हेच एकमेव उत्तर असल्याचे पदवीधर मतदारांना ज्ञात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोडसाळपणा केला तरी लवकर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम पदवीधर मतदार करणार आहे असेही धिरज लिंगाडे यांनी म्हटले आहे.