दिसले हो दिसले..! धृपदराव सावळे एकदाचे दिसले ..!!

 
cgb
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी आमदार धृपदराव सावळे हल्ली कुणाला फारसे दिसत नाहीत. भाजपचे जिल्हाध्यक्ष होते तेव्हा ते अख्खा जिल्हा पायाखाली घालायचे. आता मात्र ते खरच भाजपात आहे की त्यांच्या स्वभावाप्रमाणे गेले दूसरीकड कुठं?  असे अनेक जण विचारत असतात. पण थोड थांबा, आम्ही सांगतोय तुम्हाला की, ते भाजपातच आहे अजून! हो..कारण आज, ते साक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरल्याचे दिसून आले. निमित्त होते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या दौऱ्याचे..!

भाजप जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर धृपदराव भाऊंच दर्शन अगदीच दुर्मिळ झालंय. ते काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती पण तसे काही झाले नाही. अर्थात तिकड जाऊन फायदा काय असा विचार भाऊंनी केला असेल, कारण फायद्याशिवाय ते तिकड कशाला जातील? मात्र असे असले तरी भाजपातही त्यांचा वावर कमी झालाय. पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमात ते दिसत नाहीत. भाजप नेत्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर कधी कधी एखाद्या कोपऱ्यात त्यांचा फुटू असतो, तेच त्यांचं भाजपातल अस्तित्व..!

आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी अन् त्यानंतर भाजपा असा अनुभवी धृपदराव भाऊंचा प्रवास.भाजपने आल्या आल्या त्यांचा सन्मान करून थेट संघटनेचे पद दिले. भाजप सारख्या पक्षात एकदम तस नव्या माणसाला एवढं मोठ संघटनेचे पद देत नाहीत,पण त्यांच्यासाठी भाजपने बऱ्याच अटी शिथिल केल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या भाऊंनी भाजपचा रुमालही जिल्हाभर मिरवला.

आयुष्याची संध्याकाळ आता भाजपातच घालवणार असेही ते त्यावेळी म्हणाले. मात्र जसे अध्यक्षपद गेले तंस भाऊंचं दर्शन दुर्मिळ झालं. याआधी एकदा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यात कोपऱ्यात त्यांचा वावर दिसून आला होता. त्यानंतर आज भूपेंद्र यादवांच्या दौऱ्यातही ते कोपऱ्यात दिसले. अर्थात त्यांना स्वतःहून कोपऱ्याची जागा पसंत आहे की भाजपने त्यांना अडगळीत टाकल हे त्यांचं त्यांनाच माहीत..! मात्र आज ते दिसलेच एकदाचे धृपदभाऊ दिसले..!